Rohit Pawar On palghar sadhu murder case accused Kashinath chaudhary joins bjp marathi news | पालघर येथे जमावाने दोन साधूंची हत्या केल्याची घटना राज्याच्या राजकारणात चांगलीच गाजली होती. या हत्येनंतर तेव्हाच्या सत्ताधारी पक्षांवर भाजपाकडून गंभीर आरोप करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीला भाजपाने पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवारांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे यामध्ये त्यांनी भाजपाने काशिनाथ चौधरी यांना पक्षात प्रवेश दिल्याचे म्हटले आहे. तसेच ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच पक्षात स्थान दिल्याने त्या साधूंच्या हत्यांमागे भाजपाच होते का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे. या पोस्टला रोहित पवारांनी भाजपाचे गलिच्छ राजकारण असा हॅशटॅग दिला आहे.
पक्ष प्रवेशाचा फोटो शेअर करत रोहित पवार म्हणाले, “पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपाने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपाने पक्षात घेतलं. मग पालघर हत्याकांडामागे भाजपाच होतं, असं म्हणायचं का?”
“हेच भाजपाचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे.. राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झालं. कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपाकडून सत्तेची पोळी भाजली जाते पण यामुळं सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं, याचातरी भाजपाने विचार करावा,” असेही रोहित पवार म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
१६ एप्रिलच्या २०२२ च्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
