आशिया चषक स्पर्धेत अगदी शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या भारत-पाकिस्तान सामना भारताने पाच गडी राखून जिंकला. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांप्रमाणे आजची सायंकाळ पवार कुटुंबियांनीही भारत-पाकिस्तान सामन्यासाठी राखून ठेवल्याचं या व्हिडीओवरुन दिसून येतं. सामना जिंकल्यानंतरचा जल्लोष कसा होता हे सुप्रिया यांनी या व्हिडीओमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, यावर रोहित पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. ”शरद पवारांमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून?” रोहित पवारांना पडला आहे.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

“शरद पवार यांचा व्हिडीओ पाहून मी अवाक झालो. सकाळी द्राक्ष बागायतदार संघाचं अधिवेशन आणि आणखी एका कार्यक्रमासाठी शरद पवार हे मुंबईवरून पुण्याला आले. कार्यक्रमानंतर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीही घेतल्या व सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास पुन्हा पुण्याहून निघून रात्री उशिरा मुंबईला पोहोचले”

“त्यानंतरही त्यांनी भारत-पाकिस्तान संपूर्ण मॅच पाहिली आणि आपला भारतीय संघ विजयी झाल्यानंतर आपण जसे मनापासून आनंद व्यक्त करतो, तसा दोन्ही हात उंचावून उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला. आज सकाळपासून ते परत ठाणे दौऱ्यावर आहेत. त्यांचे हे काम गेली ६० वर्ष असंच अविरत काम सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

“अनेकांसारखा मलाही प्रश्न पडतो की, शरत पवार यांच्यात इतकी ऊर्जा येते कुठून? कदाचित यामुळेच ते माझ्यासारख्या लाखो तरुणांचे ‘आयडॉल’ आहेत”, असेही ते म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी ट्वीट केला होता व्हिडीओ

सुप्रिया सुळे यांनी भारत-पाकिस्तान सामना संपल्या संपल्या शरद पवार यांचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. या व्हिडीओत शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर मंडळी टीव्हीसमोरील डायनिंग टेबलजवळ बसून समन्याचा आनंद घेताना दिसत होते.

शेवटच्या तीन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने षटकार लगावत सामना जिंकून दिल्यानंतर शरद पवारांनी हात उंचावून जल्लोष साजरा केला. “भारतीय क्रिकेट सांघाचे आभार त्यांनी भारतासाठी हा रविवार एकदम आनंददायी केला त्याबद्दल” अशा कॅप्शनसहीत सुप्रिया यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता.