दीपक महाले

जळगाव : भविष्यात भाववाढ होईल म्हणून शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला कापूस आता खर्चासाठी पैसेच नसल्यामुळे घराबाहेर काढणे भाग पडले आहे. कापसाला प्रतिक्विंटल सात हजारांखाली दर मिळत असून, यामुळे अडीच-तीन हजारांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सुरुवातीला नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत दर मिळत होता. तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

 खुल्या बाजारात अखेपर्यंत चांगला दर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र, दरवाढीच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला.  गेल्या आठ महिन्यांपासून घरात कापसाचे ढिगारे लागले होते. त्यामुळे घरात धूळ साचून कीटकांचाही त्रास सुरू झाला होता. तापमान वाढ होत असल्याने कापसाच्या वजनात घटही झाली. दिवाळीच्या काळात कापसाला नऊ ते साडेनऊ हजारांपर्यंत, तर जानेवारीत मकरसंक्रांतीवेळी साडेआठ हजारांच्या पुढे दर होता.

२०२१ मध्ये कापसाला प्रतिक्विंटल १२ ते १३ हजारांपर्यंत दर होता. त्यामुळे दरवाढ होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला. सुरुवातीला प्रतिक्विंटलला नऊ-साडेनऊ हजारांपर्यंत दर होता. तो कमी कमी होत आहे. आता क्विंटलला ६५०० ते ६८०० पर्यंत दर आहे. खरिपाची कामे सुरू झाली असून खर्चासाठी पैसे लागत असल्यामुळे शेतकरी कापूस व्यापाऱ्यांना देत आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– नाना धनगर, कापूस व्यापारी

 २०२१ मध्ये कापूसच शिल्लक नव्हता. जादा दर देऊनही कापूस मिळत नसल्याने जीनिंगचा हंगाम मार्चमध्येच बंद झाला होता. गरज वाढली आणि कापूस कमी यांमुळे मार्चमध्ये साडेनऊ हजारांचा दर मिळाला होता. आता शेतकऱ्यांकडून घराबाहेर कापूस काढला जात आहे. सध्या प्रतिक्विंटलला ६८०० रुपयांपर्यंत दर दिला जात आहे.

 – अरविंद जैन, उपाध्यक्ष, खानदेश जीनिंग असोसिएशन