Maharashtra HSC 12th Result 2019 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. हालाकीच्या परिस्थितीवर मात करत प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर पुण्यातील ३६ वर्षीय रेखा सिरसाट बारावीमध्ये चांगल्या गुणांने पास झाल्या आहेत. घरची हालाकीची परिस्थिती आणि कमी वयात लग्न झाल्याने रेखा जनार्दन सिरसाट यांनी सातवीनंतरचे शिक्षण घेणे शक्य झाले नाही. पण जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर घरातील काम, मुलांना सांभाळून वयाच्या 36 व्या वर्षी रात्र शाळेच्या माध्यमातून त्यांनी बारावीच्या परीक्षेत 70.61 टक्के मिळवला आहे. त्या शाळेत रेखा यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.
आणखी वाचा : Maharashtra HSC 12th Result 2019: यंदाही मुलींचीच बाजी! राज्याचा निकाल ८५.८८ टक्के
लोकसत्ता ऑनलाईनशी या यशाबद्दल बोलताना रेखा शिरसाट म्हणाल्या की, आम्ही दोन बहिणी आणि तीन भाऊ आहोत. घरची परिस्थिती नाजूक असल्याने वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले. त्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. मात्र 2013 साली 8 वीमध्ये पूना नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून शिक्षणासाठी सुरुवात केली. या दरम्यान अनेक घरामध्ये प्रसंग पाहिले.पण कधीही मागे सरली नाही आणि माझे शिक्षण चालू ठेवले. दहावी आणि आता बारावीत प्रथम आली आहे. तर मुलगा यंदा बारावीमध्ये गेला आहे. तसेच आता पुढे मला वकील व्हायचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच मला शिक्षण घेण्यासाठी घरातील सर्वानी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
आणखी वाचा : शाब्बास! आयपॅडवर परीक्षा देत दिव्यांग निष्काने मिळवले ७३ टक्के
राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका असून यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ पासून निकाल ऑनलाइन पाहता येईल. राज्यभरातून बारावीच्या परीक्षेत १४ लाख २३ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती. परीक्षेत १४ लाख २४ हजार ५०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४ लाख २१ हजार ९३६ इतकी होती. यात मुलींची संख्या ६ लाख ३० हजार २५४ तर मुलांची संख्या ७ लाख ९१ हजार ६८२ इतकी होती. यातील १२ लाख २१ हजार १५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा निकाल ८५. ८८ टक्के इतका लागला आहे.