शिवसेनेने संभाजीराजे छत्रपती यांना अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा नाकारल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेनेचे उमेदवार म्हणून ही निवढणूक लढवावी, ही अट संभाजीराजे छत्रपती यांनी नाकारल्यानंतर शिवसेनेनं संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर संभाजीराजे काय भूमिका घेणार? याविषयी उत्सुकता लागली होती. आज संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत ही राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच, यापुढे ‘स्वराज्य’ संघटनेच्या माध्यमातून मावळ्यांना, गोरगरीब समाजघटकांना एकत्र करण्यासाठी मी मोकळा झालो आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, पाठिंबा द्यायचं नक्की झाल्यानंतर देखील ऐन वेळी काय घडामोडी घडल्या, याविषयी संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत खुलासे केले आहेत.

“जर हा संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर…”

“मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर आपण दोघांनी तिथे जाऊ. दोघांनी शिवाजी महाराजांचं स्मरण करु. जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगाल ते खरं”, असं संभाजीराजे छत्रपती यावेळी म्हणाले.

Rajwardhan Kadambande on Shahu Maharaj
“मी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वारसदार, कोल्हापूरकरांना माझे…”, राजवर्धन कदमबांडे काय म्हणाले?
Shahu Maharaj, Sanjay Mandalik,
वारसा नको तर विकासावर बोलूया; संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण
Tanaji Sawant News
तानाजी सावंतांचा अजित पवारांसमोरच मोठा इशारा; म्हणाले, “…तर आम्ही सहन करणार नाही”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

सुरुवात कुठून झाली?

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या राज्यसभा अपक्ष उमेदवारीला पाठिंबा मिळवण्यासाठी आवाहन केल्यानंतरचा सगळा घटनाक्रम पत्रकार परिषदेत सांगितला आहे. “दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले होते. आमची बैठक ओबेरॉयमध्ये झाली. त्यांनी दोघांनी मला सांगितलं की शिवसेनेची इच्छा आहे आपण शिवसेनेत प्रवेश करावा, उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी जाहीर करतो. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

संभाजीराजेंना मुख्यमंत्र्यांचा फोन…

“मुख्यमंत्र्यांनी मला फोन करून निमंत्रित केलं की वर्षावर तुम्ही आलात तर आपण चर्चा करू शकतो. लोकशाहीतलं मुख्यमंत्रीपद केंद्रस्थान असतं म्हणून उद्धव ठाकरेंना मी भेटायला गेलो. तिथे तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की आम्हाला छत्रपतींना बाजूला ठेवायचं नाही, ते आम्हाला बरोबर पाहिजेत. त्यांचा पहिला मुद्दा होता की आपण शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्या मिनिटाला मी तो प्रस्ताव नाकारला”, अशी माहिती संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेनं पाठिंबा नाकारल्यानंतर संभाजीराजेंचा राज्यसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय; म्हणाले, “…आता मी मोकळा झालोय”!

संभाजीराजेंचा उद्धव ठाकरेंना प्रस्ताव…

“मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे एक प्रस्ताव आहे. शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात. मी त्यांना म्हणालो की शिवसेनेच्या माध्यमातून मला महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार करा. उद्धव ठाकरेंनी विचार केला. त्यांनी सांगितलं की राजे ते शक्य होणार नाही. पण महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनापुरस्कृत अपक्ष उमेदवार आम्ही तुम्हाला करू शकतो. ही वाक्य मुख्यमंत्र्यांची आहेत. मी ते मान्य केलं नाही. पण मी म्हटलं तुम्ही दोन दिवस विचार करा, मी दोन दिवस विचार करतो. आपण परत भेटू”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

दोन दिवसांनी पुन्हा फोन…

“दोन दिवसांनी त्यांच्या मंत्र्यांनी फोन करून सांगितलं की मुख्यमंत्र्यांना तुमच्याशी चर्चा करायची आहे. तुम्हाला उमेदवारी द्यायची आहे. मग आमची बैठक झाली मंत्र्यांच्या घरी. तिथून आम्ही ओबेरॉयला गेलो. ड्राफ्ट तयार झाला. मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि माझ्या सूचना या एकत्र करून ड्राफ्ट तयार झाला. मंत्र्यांच्या अक्षरात हस्तलिखित आहे. माझ्या मोबाईलमध्ये तो ड्राफ्ट आहे. ओबेरॉयमध्ये शिष्टमंडळ भेटायला आले. एक मंत्री, त्यांचे स्नेही आणि एक खासदार होते. त्यांच्या स्नेहींनी बैठकीच्या आधीच सांगितलं की आजही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करावा. मी त्यांना हात जोडून सांगितलं की मग ही बैठक संपली. माझी भूमिका स्पष्ट आहे”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

“त्यानंतर मंत्र्यांनी सांगितलं की राजे हा ड्राफ्ट आपण पुन्हा वाचू. त्यात काही बदल असतील तर सांगा. हा अंतिम ड्राफ्ट म्हणून आपण नक्की करू. त्यात एक शब्द बदलला. तो शब्द काय होता ते मला इथे सांगायचं नाही. मंत्र्यांनी हा ड्राफ्ट फायनल असल्याचं सांगितलं आणि मंत्री तिथून निघून गेले. मी तिथून कोल्हापूरला निघालो. तिथे जाताना मला बातम्या दिसल्या की वर्षावर शिवबंधन, उद्या प्रवेश करणार वगैरे. कोल्हापुरात गेल्यानंतर समजलं की संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली. मी तिथे होते त्या खासदारांना फोन केला. ते काही बोलू शकले नाही. मंत्रीमहोदयही काही बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना फोन लावला. त्यांनी माझा फोन घेतला नाही”, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व घटनाक्रम सांगितला.