रायगड जिल्ह्य़ात कर्जत तालुक्यातील चौक येथे रक्तचंदनाचा अडीच टन साठा घेऊन जाणारा ट्रक वनविभागाने पकडला आहे. बाजारभावाप्रमाणे या रक्तचंदनाची किंमत २५ लाखांच्या घरात आहे. त्यामुळे रक्तचंदन तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्हा हे रक्तचंदन तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. पनवेल, उरण, खालापूर आणि आता कर्जत येथे रक्तचंदनाची वाहतूक करणारे ट्रक्स आणि कंटेनर जप्त करण्यात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या रक्तचंदनाला मोठी मागणी असल्याने लाकूड माफिया जिल्ह्य़ात सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे. जेएनपीटी बंदरातून कंटेनरच्या माध्यमातून हे लाकूड परदेशात पाठवले जात असल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले आहे.
    रक्तचंदनाचे लाकूड घेऊन एक ट्रक कर्जतमार्गे मुंबईला जाणार असल्याची खबर कर्जतच्या वनविभाग अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी चौक येथे वाहने तपासणीला सुरुवात केली होती. तब्बल ६०० वाहने तपासल्यानंतर चौक येथील अरुण ढाबा येथे एक तामिळनाडू पासिंगचा ट्रक आढळून आला. टीएन-१८ क्यू ९९८४ असा या ट्रकचा नंबर असून या ट्रकची तपासणी केली असता त्यात मोठय़ा प्रमाणावर रक्तचंदन साठा आढळून आला. अडीच टन वजनाच्या या रक्तचंदनाची किंमत बाजारात २५ लाखांच्या घरात असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
  दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन ट्रकचालक व त्याचे साथीदार फरार होण्यात यशस्वी झाल्याचे वनक्षेत्रपाल राजीव घाडगे यांनी सांगितले. या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याबाबत अधिक तपास करीत आहेत.