काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा जेव्हा काश्मीरमध्ये पोहोचेल, तेव्हा या यात्रेत सहभागी व्हावं, अशी माझी इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत हे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असताना त्यांनी पत्रकार परिषेदेत हे विधान केलं होतं. संजय राऊतांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही त्यांना टोला लगावला आहे.
“ठाकरेंचा भोंगा म्हणून महाराष्ट्रास माहीत असलेले संजय राऊत हे आता राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी होण्याचे निमित्त साधून पळ काढू पाहात आहेत.” असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत. तसेच, “महाराष्ट्र हे असुरक्षित राज्य आहे, असे म्हणणारे संजय राऊत महाराष्ट्रद्रोही आहेत.” असा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाल्यामुळे ठाकरे गटाने त्यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे. भ्रष्टाचारी राष्ट्रवादी आणि घटनाबाह्य ठाकरे गट अशी युती महाराष्ट्राची जनता यापुढे सहन करणार नाही.”, असा इशाराही उपाध्येंनी दिला.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत? –
“भारत जोडो पुढच्या दोन दिवसात दिल्लीत दाखल होणार आहे. या यात्रेत सहभाही होण्यासाठी राहुल गांधींचे मला पत्र आले आहे. पण मी स्वत: असं ठरवलं होतं, की भारत जोडो यात्रा जेव्हा काश्मीरमध्ये पोहोचेल, तेव्हा या यात्रेत सहभागी व्हावं. मात्र, दिल्लीतील यात्रेत सहभागी होण्याबाबत आम्ही विचार करू”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.