महाराष्ट्र दिनी म्हणजेच येत्या १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील प्रस्तावित सभेला गुरुवारी परवानगी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परवानगीवरून बरीच चर्चा सुरू होती. विशेषत: मनसेचा पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तर सभेमध्ये राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून मोठा वाद उफाळला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? यावरून तर्क-वितर्क सुरू झाले होते. यासंदर्भात मनसेकडून परवानगी मिळणारच असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. अखेर ती परवानगी गुरुवारी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं. या सभेसंदर्भात आज मुंबईमध्ये पत्रकारांनी संजय राऊत यांनी प्रश्न विचारला असताना त्यांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली.

नक्की वाचा >> भोंगा वादात अमृता फडणवीसांची उडी; योगी आदित्यनाथांचा संदर्भ देत ठाकरे सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या, “ऐ भोगी काहीतरी…”

औरंगाबादमधील सभेला सशर्त परवानगी देताना उपस्थितांची संख्या १५ हजार असावी, जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य टाळणं आणि वैयक्तिक टीका न करणं यासारख्या अटींचा समावेश आहे. राज ठाकरेंनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी तीन मेचा अल्टीमेट दिल्याने या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच या सभेला परवानगी दिल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी महाराष्ट्रात अनेक सभा होत असल्याचं सांगत या सभेला फार महत्व देत नसल्याचं सूचित करण्याचा प्रयत्न केला.

नक्की वाचा >> योगी सरकारने ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण महाराष्ट्रात…”

सभेच्या परवानगीवरुन काय म्हणाले?
“महाराष्ट्रात अनेक सभा होतात आम्ही घेतो, राष्ट्रवादीची किती मोठी सभा झाली पाहिलं असेल. महाराष्ट्रात अनेक सभा होत असतात. आता सहा सभा आहे वेगवगेळ्या पद्धतीने,” असं राऊत राज यांच्या सभेबद्दल विचारलं असता म्हणाले. तसेच पुढे त्यांना सभेच्या परवानगीसंदर्भात विचारण्यात आलं असता त्यांनी, “मला माहिती नाही तिकडचे पोलीस आयुक्त आहेत ते काय तो निर्णय घेतात,” अशी प्रतिक्रिया दिली.

राऊतांचा राज ठाकरेंना टोला
उत्तर प्रदेशातील घडामोडी आणि त्यावर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये टीप्पणी केली. “आता योगी कोण आणि भोगी कोण यासंदर्भात मतपरिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्याला पीएचडी करायची असेल तर त्याने करावी,” असं राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावताना म्हटलं आहे.