निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असणाऱ्या पक्षावरील दाव्यासंदर्भात आदेश देताना बहुमताचे कागदोपत्री पुरावे ८ ऑगस्ट पर्यंत पुरावे सादर करावे असे आदेश दिले आहेत. याचसंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील ११ कोटी जनता हाच आमची शिवसेना खरी असल्याचा पुरावा आहे, असं म्हटलंय. पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या हक्कासाठी झालेली, मराठी माणसाच्या हृदयात ही शिवसेना आहे, असं सांगतानाच बंडखोरांवर टीका केली. यावेळेस त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत बंडखोरांबद्दल भाष्य केलं.

नक्की वाचा >> “शाहांसोबतच्या बैठकीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं पण उद्धव ठाकरेंनी…”; ‘मातोश्री’वरील भेटीबद्दल माजी आमदाराचा खुलासा

“ही एक अस्वस्थ करणारी घटना आहे. मराठी माणसाच्या हृद्याला घरं पाडणारा हा प्रसंग आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली. हिंदुत्वाचा विचार घेऊन ही संघटना पुढे गेली. या संघटनेवर फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची हे सादर करण्याची वेळ आणावी यासारखं महाराष्ट्राचं दुर्देव नाही,” अशा शब्दांमध्ये राऊत यांनी खंत व्यक्त केलीय. तसेच त्यांनी बंडखोरांना बाळासाहेबांची शिवसेना दिल्लीश्वरांच्या आदेशाने संपवायची असल्याचा आरोप केला. “आपण फुटलेला आहात, फुटीर आहात तर आपण आपल्याला नव्या संसारात सुखाने राहा. पण दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायची आहे. त्यांचं हत्यार म्हणून महाराष्ट्राविरुद्ध, मराठी माणासाविरुद्ध हे (बंडखोर) वापरले जातायत,” असं राऊत यांनी म्हटलं. “जे लोक बंड करुन गेलेत त्यांना माझं आवाहन आहे की जिथे आहात तिथे आराम राहा. आपला गट बनवा. पण तुम्ही शिवसेनेला आव्हान देत आहात. खरी शिवसेना, खोटी शिवसेना अशा वार्ता करता,” असंही राऊत म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: एक कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणातील वादग्रस्त अधिकारी होणार CM शिंदेंचा सल्लागार?

“उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मराठी माणसाच्या हृदयात या शिवसेनेला स्थान आहे. आज आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणता हे पाप तुम्हाला फेडावं लागेल. ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घातलेत, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले, शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणलीय. त्यांना या राज्याची जनता माफ, आई जगदंबा आणि नियती माफ करणार नाही. महाराष्ट्राची ११ कोटी जनता हाच पुरावा आहे,” असंही राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

“सीमाप्रश्नासाठी मेलेले आमचे ६९ हुतात्मे हा आमचा पुरावा आहे. मराठी माणूस शहीद झाला, तुरुंगात गेला. १९९२ दंगलीमध्ये आमच्यासहीत अनेकांवर खटले झाले, मारले गेले, हा पुरावा आहे. या मातीतील माणसामध्ये, मनगटामध्ये, रक्तामध्ये, मातीच्या कणाकणामध्ये शिवसेना आहे, हा पुरावा आहे,” असं भावनिक विधान राऊत यांनी केलं. “१०-२० लोक फोडले पैसे देऊन आणि दहशतीने हा पुरावा होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असून बाळासाहेबांच्या विचाराने शिवसेना पुढे चालली आहे पुरावा काय आहे शिवसेनेचा याचं उत्तर राज्याची जनता देईल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पाहा व्हिडीओ –

नक्की वाचा >> उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेनंतरच एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय; बंडखोर खासदाराचे स्पष्टीकरण

“निवडणूक आयोग आणि सर्व यंत्रणा सध्या काय आहेत आपल्याला ठाऊक आहे. शिवसेनेचे लोकसभेचे आमचे गटनेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना तीनदा पत्र लिहिलं त्याचं उत्तर दिलं नाही. पण एक फुटीर गट जातो आमचा गट खरा सांगतो आणि त्यांना २४ तासामध्ये मान्यता दिली जाते. तुम्ही कोणते पुरावे सादर करणार? सत्याचा असा खून होत असताना तुम्ही कोणत्या पुराव्याच्या गोष्टी करताय?” असा प्रश्न त्यांनी बंडखोरांना विचारला. “आमच्याकडे पुरावा मागितला तर आमचे हजारो शिवसैनिक मराठी अस्मिता आणि हिंदुत्वासाठी शहीद झालेत. याहून अधिक मोठा पुरावा आमच्याकडे नाही,” असंही राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुर्मू यांचं अभिनंदन करणारी मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; फोटो ठरतोय चर्चेचा विषय

“बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दिल्लीच्या आणि महाराष्ट्रद्वेषी असणाऱ्यांच्या आदेशानं ज्यांनी ही वेळ आणली आहे त्यांना बाळासाहेब माफ करणार नाहीत. मला असं वाटतं, वरुन बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा पाहतोय. तो तुम्हाला (बंडखोरांना) माफ करणार नाही,” असंही राऊत म्हणाले. “या मातीतच तुम्ही संपून जाल. आज तुम्ही घोड्यावर बसला आहात, उद्या लोक तुमची गाढवावरुन झिड काढल्याशिवाय राहणार नाहीत, मार्क माय वर्ल्ड्स,” असंही राऊत म्हणाले.

नक्की वाचा >> …अन् अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर आदित्य ठाकरेंचा ताफा थांबला

“महाराष्ट्रात सरकार अस्तित्वातच नाहीय. एक महिना होत आला तरी सरकारचं अस्तित्व दिसत नाहीय. दोघाचं मंत्रीमंडळ आहे. अजूनही चाचपडतायत सरकार बनवण्यासाठी आणि दुसरीकडे मोठे मोठे निर्णय घेतायत. ते निर्णय सुद्धा बेकायदेशीर आणि असैविधानिक आहेत, इतकेच मी सांगू शकतो,” असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारला लक्ष्य केलं.