लांजा तालुक्यातील एका ग्रामसेविकेकडून तब्बल ४५ हजारांची लाच स्वीकारताना कोलधे ग्रामपंचायतीच्या  सरपंचाला लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी चक्क लांजा पंचायत समितीच्या कार्यालयात रंगेहात पकडल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी दीपक बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील कोलधे ग्रामपंचायतीतील कंत्राटी ग्रामसेविका म्हणून तेजश्री सुरेश खटावकर या कार्यरत होत्या. चार वर्षांपूर्वी कंत्राटी ग्रामसेवक म्हणून भरती झाल्यानंतर त्यांची कोलधे ग्रामपंचायतीमध्ये नेमणूक झाली. या ग्रामपंचायतीत काम करीत असताना वर्षभरापूर्वी तिने ऊर्जाबचत दिवे खरेदी केले होते.
 दिवे खरेदीबाबतच्या धनादेशावर सरपंच व ग्रामसेवक या दोघांच्याही सह्य़ा आवश्यक असताना ग्रामसेविका तेजश्री खटावकर हिने आपल्या अधिकारात दिवे खरेदी केले. परंतु त्यानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर ग्रामसेविकेने सरपंच वसंत घडशी यांना याबाबतच्या प्रस्तावावर सह्य़ा करण्याची वारंवार विनंती केली. मात्र आपल्याला न विचारता व आपले अधिकार असताना ग्रामसेविकेने दिवे खरेदी केल्याने सरपंच घडशी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करून ग्रा. पं. कार्यालय एक महिना बंद ठेवले होते. अखेर लांजा पंचायत समितीकडून ग्रामसेविका खटावकर यांना नोटीस देण्यास आली. तसेच प्रस्तावावर सरपंच घडशी यांची स्वाक्षरी घेण्याबाबत कळविण्यात आले. त्यानंतर ग्रामसेविका खटावकर यांची राजापूर तालुक्यातील सौंदळ ग्रामपंचायतीत बदली करण्यात आली. आणि याच दरम्यान चार वर्षे कंत्राटी ग्रामसेविका म्हणून कार्यरत असलेल्या तेजश्री खटावकर यांची कायमस्वरूपी नेमणूक झाल्याची ऑर्डरही निघाली. मात्र कोलधे ग्रामपंचायतीत असताना दिलेली नोटीस परिपूर्ण  करण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे आता आपल्याला कायम स्वरूपाची नोकरी मिळणार असल्याने तेजश्री खटावकर यांनी ऊर्जाबचत दिव्यांच्या प्रस्तावावर तसेच अन्य कागदपत्रांची पूर्तता करता यावी म्हणून  सरपंच वसंत घडशी यांच्याशी संपर्क साधला व हे प्रकरण मिटविण्यासाठी गळ घातली. आणि यावेळी सरपंच घडशी यांनी ग्रामसेविकेकडे ४५ हजार रुपयांची मागणी केली.
दरम्यान ग्रामसेविका खटावकर हिने रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर शुक्रवारी (१ फेब्रु.) रात्री ९.५५ वाजण्याच्या दरम्यान लांजा पंचायत समितीच्या कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी संतोष म्हेत्रे, कोलधेचे ग्रामसेवक मुसळे तसेच ग्रामसेवक नामदेव जाधव यांच्यासमोर सरपंच वसंत घडशी यांना ग्रामसेविका तेजश्री खटावकर यांच्याकडून ४५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले व त्यांना अटक केली.
ही कारवाई रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी (लाचलुचपत) दीपक बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक लोकेश कानसे, उपनिरीक्षक मधुकर घोसाळे, चवेकर, जाधव, सुतार, हरजकर, वीर महिला कर्मचारी विचारपूरकर, चालक देसाई यांनी केली. एखादा सरपंच चक्क पंचायत समितीच्या कार्यालयातच लाच स्वीकारण्यास तयार होतो, याचेच आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.