विधान परिषदेच्या मुंबई, कोल्हापूर आणि धुळे स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघांतील निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे ‘लक्ष्मीदर्शन’ होणार नसल्याने मतदार असलेल्या नगरसेवक मंडळींचा हिरमोड झाला. 

कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार व गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यातील लढत चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात होती. उभय उमेदवार आर्थिकदृष्ट्या तगडे असल्याने नगरसेवक मंडळीही आशेवर होती. पण भाजपच्या महाडिक यांनी माघार घेतल्याने सारेच चित्र पालटले. राज्यमंत्री पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे कोल्हापूरमधील नगरसेवकांच्या पदरी निराशा आली. काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने मुंबई महापालिकेतून शिवसेनेचे सुनील शिंदे तर भाजपचे राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड झाली. 

धुळे मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली. नागपूर व अकोला, बुलढाणा, वाशीम मतदारसंघात मात्र कोणत्याही उमेदवाराने माघार न घेतल्याने १० डिसेंबरला मतदान होईल.

झाले काय?

 अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत उमेदवारांच्या माघारीमुळे मुंबई, कोल्हापूर, धुळ्यातील निवडणूक बिनविरोध झाली. सहापैकी चार जागांवर बिनविरोध निवड झाली असून, भाजपला दोन तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली. निवडणूक बिनविरोध झाल्याने नगरसेवकांना ‘भाव’ मिळाला नाही.

पक्षनिहाय विजयी उमेदवार

भाजप: २, शिवसेना: १, काँग्रेस:१