सलगच्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शिवार कोरडा ठाक पडलाय. गावातलं चैतन्य उन्हात हरवलं आहे. बऱ्याच शिवारात कमी जास्त प्रमाणात हीच स्थिती पहायला मिळते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील चिंचोली माळी हे मराठवाड्यातल असंच एक गाव. दुष्काळ, पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्या या गावात आमिर खानच्या ‘वॉटरकप’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण वर्ग सुरु झाले.  तीन पुरुष आणि दोन महिलांनी वॉटरकप स्पर्धेच प्रशिक्षण घेतलं. मात्र, लता बर्डे ही त्यातील एकटी प्रशिक्षणार्थीं महिला सध्या वॉटरकप स्पर्धेचं काम करत आहे.

लता ही चिंचोली माळी गावची लेक आहे. अच्युतराव बर्डे आणि वछालाबाई बर्डे यांच्या घरी जन्मलेल्या लताच जेमतेम पाचवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिचा विवाह करण्यात आला होता. लताला शिक्षणाची खूप इच्छा होती. परंतु घरच्यांनी लग्न लावून दिलं. त्यातच सासरचा आधार जास्त दिवस मिळाला नाही. नवऱ्याच्या अकाली निधन झालं. पोटी मुलबाळ नव्हते, त्यामुळे सासरच्या मंडळींकडून त्रास सुरु झाला. या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली. घरच्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला, पण तिने नकार दिला. एकल महिला गटाच्या माध्यमातून काम करत असताना आमिर खानच्या वॉटर कप स्पर्धेशी जोडली गेली. त्यानंतर आता ती एकटीच दुष्काळाशी दोन हात करतेय.

वॉटरकप स्पर्धेच्या प्रशिक्षणाचे वर्ग संपल्यानंतर गावा गावात कामाला सुरुवात झाली. मात्र चिंचोली माळी गावात गावकीचे रंग सुरु झाले. प्रशिक्षणाला गेलेल्या पाच जणांपैकी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी एकही पुढे आला नाही. पण लता बर्डे यांनी हार मानली नाही. हातात टिकाव, फावडे घेतलं आणि कामाचा श्रीगणेशा केला. पहिले दोन दिवस एकटी राबत होती. त्यानंतर रस्त्याने येणारे-जाणारे कामात मदत करु लागले. मात्र, सोबत कोणीही नव्हते. ज्यांची सोबत मिळेल अशी अपेक्षा होती. ते पैसे किती मिळणार विचारत होते. त्यामुळे ती एकटीच सकाळ- संध्याकाळ राबत राहिली.

निस्वार्थपणे लता काम करत राहिली आणि त्याचं फळही त्यांना मिळालं. जितेंद्र जोशीने मराठवड्यात आल्यानंतर लताच्या कामाचं कौतुक केलं. त्यामुळे एकटीने केलेलं काम प्रकाश झोतात आल्याने सगळ्यांकडून अभिनंदन केलं गेलं. केज विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार संगीत ठोंबरे यांनी प्रत्यक्ष चिंचोली माळी गावाला भेट दिली. त्यावेळी आमदारांच्या ताफ्यासोबत कार्यकर्त्यांच्या गाड्या कामाच्या ठिकाणी धुरळा उडवत आल्या. कार्यकर्त्यांनी आमदार सोबत फोटो सेशन केलं. त्यावेळी आमदारांनी सगळ्यांना सोबत काम कण्याच्या सूचना केल्या. मात्र आमदार गेल्यानंतर पुन्हा जैसे तेच परस्थिती. गावातून कोणीही कामाला आलं नाही. कधी अपंग भावाची साथ मिळाली. तर कधी शेजाऱ्यांनी थोडा हातभार लावला. अन्यथा एकटीने सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असं काम केलं. त्यातून ३३ खड्डे खंदल्याचं लताने सांगितलं. यावेळी झाडे लावून त्याचं संगोपन करणार असल्याचा विश्वास देखील तिने व्यक्त केला.

या कामासाठी लताला आई वडिलांकडून प्रोत्साहन दिले. यावेळी लताच्या आई म्हणाल्या की, पती गेल्यानंतर लता उदास रहायची. तिच कशातच मन राहिल नव्हत. साऱ्या गावाची लेक आणि साऱ्या गावाची बहीण म्हणून काम कर,असं मी तिला सांगितल आहे. वडील आणि भाऊ पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळे हे काम करू शकते, असे लता म्हणाली.