सावंतवाडी पर्यटन महोत्सवात खुपते तेथे गुप्तेफेम अवधूत गुप्ते यांनी सहभाग दर्शवून हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. नगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाच्या सांगता समारंभात कोकणचे राजकारण व समाजकारण खुपते, तसेच कोकणाला निसर्गसौंदर्य, फळबागायतीची पुण्याई मिळूनही विकास झाला नसल्याचे म्हणाला.
सावंतवाडी नगरपालिका पर्यटन महोत्सव सांगता समारंभात स्वरांजली प्रस्तृत हेगिष्टे निर्मित सितारे जमीं पर कार्यक्रम सादर झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांचा हिंदी मराठी गीत आणि नृत्याचा अविस्मरणीय कार्यक्रम व लेझर शो झाला. त्यात झी टीव्ही सारेगम विजेता विश्वजीत बोरवणकर, झी टीव्ही सारेगम उपविजेती सावनी रवींद्र, सिने डान्सर नम्रता सुतार व शुभांगी सावंत यांनी गीत सादर केले तर चित्रपट अभिनेता स्वप्नील राजशेखर याने निवेदक म्हणून भूमिका बजावली.
यावेळी अवधूत गुप्ते यांनी तासाभराच्या कार्यक्रमात सर्वाची मने जिंकली. माझी आई मळगांवची, लहानपणी सावंतवाडी बस स्टॉपवर उतरून चालत मळगांवला जायचो अशा जुन्या आठवणीना उजाळा देत अवधूत गुप्ते याने आपल्या आजोबांनी, तू आमच्या परिसरात गीत गाणार, तेव्हाच गायक झाला असे मानीन असे म्हटल्याची आठवण करून देत आज मी खऱ्या अर्थाने गायक झाल्याचे म्हटले.
या महोत्सवाच्या सांगता समारंभाचे आकर्षण अवधूत गुप्ते असल्याने चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अवधूत गुप्ते यांनी जय जय महाराष्ट्र, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशा विविध गाण्यांची धमाल उडवून देत प्रेक्षकांची मने जिंकली. या महोत्सवाच्या सांगता समारंभात गुप्ते यांच्या कार्यक्रमास वन्स मोअरचा प्रतिसादही मिळाला.
या सांगता समारोपप्रसंगी दै. तरुण भारतचे संपादक व महाराष्ट्र एकीकरणचे किरण ठाकूर, डी. के. टुरिझमचे डी. के. सावंत, अवधूत गुप्ते, पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई व इतरांचा सत्कार आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. किरण ठाकूर यांचा गौरव करताना लोकमान्य मल्टीपस संस्थेने शहराच्या स्वच्छतेत सहभागी होत असल्याचे जाहीर केले.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी स्वच्छता, महिला समानता, विकासासाठी कटिबद्ध राहण्याची जनसमुदायाला शपथ दिली. यावेळी ते म्हणाले, स्त्रीचे महत्त्व वाढविण्यासाठी सर्वानी प्रयत्न करतानाच छेडछाड करणाऱ्याविरोधात समाजानेच उभे राहण्याचे आवाहन केले. आयटी इंडस्ट्रीज आणून २०० तरुणांना रोजगार देण्याचे जाहीर केले. शिवाय पुढच्या वर्षीचा पर्यटन महोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी नियोजन करण्याचे जाहीर केले.
सीमाप्रश्न येत्या वर्षभरात सुटेल अशी अपेक्षा किरण ठाकूर यांनी व्यक्त करून पुढच्या काळात लोकमान्य मल्टीपर्पल संस्थेच्या माध्यमातून या भागाचा विकास केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार विनायक राऊत म्हणाले, कोकणपण टिकवून पर्यटन विकासासाठी सर्वानी एकदिलाने काम करू या, तसेच सावंतवाडी नगरपालिकेने पर्यटन क्षेत्रात अनुकूल वातावरण बनविण्यासाठी घेतलेली आघाडी कौतुकास्पद आहे, असे म्हणाले. मानवनिर्मित कचरा दूर करण्यासाठी नगर परिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी केले. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नगरसेवक विलास जाधव, राजू बेग, सुहास आरेकर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2013 रोजी प्रकाशित
मान्यवरांच्या उपस्थितीत सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची सांगता
सावंतवाडी पर्यटन महोत्सवात खुपते तेथे गुप्तेफेम अवधूत गुप्ते यांनी सहभाग दर्शवून हजारो प्रेक्षकांची मने जिंकली. नगरपालिकेने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाच्या सांगता समारंभात कोकणचे राजकारण व समाजकारण खुपते, तसेच कोकणाला निसर्गसौंदर्य, फळबागायतीची पुण्याई मिळूनही विकास झाला नसल्याचे म्हणाला.
First published on: 02-01-2013 at 05:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savantwadi tourisum mohotsav ends with greatfull responce