सावंतवाडी पर्यटन महोत्सवात मोती तलावातील तरंगत्या शोभायात्रेने सर्वाचे लक्ष वेधले. त्यानंतर पर्यटन महोत्सवाच्यी शानदार उद्घाटनप्रसंगी हा महोत्सव नसून लोकोत्सव असल्याचे सांगितले. पर्यटकांना आकर्षित करून पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी पर्यटन महोत्सवात कलाप्रदर्शन, फुड फेस्टीवल, विविध स्पर्धा असा थाट आहे. या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी पर्यटनवाढीने सिंधुदुर्ग व सावंतवाडीचे अर्थकारण बदलेल म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
आमदार दीपक केसरकर म्हणाले, पर्यटनाच्या माध्यमातून विकास करताना फळबागायतीच्या विकासातून तरुणांच्या हाती रोजगार मिळावा म्हणून सुमारे शंभर कोटी रुपयांचा फुड पार्क प्रकल्प सावंतवाडी मतदारसंघात उभा करण्याचा मानस व्यक्त केला. सावंतवाडी शहरासह जिल्ह्य़ाचा विकास साधताना सागरी किनारी विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार भरीव तरतूद करणार आहेत, तसेच यापूर्वी काही तरतूद केल्याचे आम. केसरकर म्हणाले.
महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आशीश पेडणेकर यांनी व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी चेंबर्सचे कायमच प्रयत्न राहिले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात १९, २० व २१ जानेवारी रोजी पर्यटन परिषद असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत, असे म्हणाले.
या वेळी माजी आमदार शिवराम दळवी, माजी आमदार जयानंद मठकर, शंकर कांबळी, पुष्पसेन सावंत, सुरेश दळवी, नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी विचार मांडले.नवोदित पाश्र्वगायिका ऊर्मिला धनगर हिचा गायनाचा कार्यक्रम या वेळी झाला. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.