अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांचं निधन झालं आहे. आमदार शर्मा हे मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गोवर्धन शर्मा यांच्या मृत्यूनंतर भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक प्रतिक्रिया देत श्रद्धांजली वाहिली आहे.

‘एक्स’वर लिहिलेल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अकोला पश्चिमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. लालाजी या नावाने सुपरिचित असलेले गोवर्धनजी कायम जनतेत राहणारे होते. लोकांच्या दु:खात कायम आणि हक्काचा मदतीचा हात अशीच त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ सहकारी आणि एक पक्षनिष्ठ, ध्येयवादी नेता गमावला आहे. पक्षाची ही अपरिमित हानी आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अकोला जिल्ह्यात पक्षाचे शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष अशा विविध जबाबदार्‍या सांभाळत पक्षविस्तारात त्यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. नगरसेवक, आमदार, राज्यमंत्री आदी विविध जबाबदार्‍यांमधून त्यांनी जनतेची सेवा केली. विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार तर त्यांनी केलाच. पण, या मंदिराच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक क्षेत्रातही मोठे कार्य केले. शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. अगदी अलीकडे मुंबईत त्यांना उपचारासाठी आणण्यात आले तेव्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. राममंदिराच्या आंदोलनात सक्रिय सहभाग, अकोल्यातील रामनवमी शोभायात्रेची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या निधनाने एक सच्चा रामभक्त आम्ही गमावला आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या कुटुंबीयांना आणि सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, अशी मी प्रार्थना करतो,” अशा शब्दांत फडणवीसांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.