धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, मालेगावचे प्रथम महापौर ‘साथी’ निहाल अहमद यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील बडा कब्रस्तानात दफनविधी पार पडला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय जमला होता.
सोमवारी सकाळी नाशिक येथे उपचारादरम्यान निहालभाईंचे निधन झाले. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे पार्थिव येथील हजारखोली भागातील निवासस्थानी आणण्यात आले. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांची एकच रीघ लागली होती. रात्री नऊ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. नवीन बस स्थानक, किदवाई रोड, जनता दल कार्यालय, मोहंमद अली रोड यामार्गे ही अंत्ययात्रा कब्रस्तानात पोहोचली. मौलाना अफजल, मौलाना हिलाल अहमद आदींच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी करण्यात आले. याप्रसंगी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आ. कपिल पाटील, आ. पंकज भुजबळ, आ. आसिफ शेख, महापौर हाजी मोहंमद इब्राहीम, प्रांताधिकारी अजय मोरे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संवेदनशील अशा मालेगावचे सुमारे ३० वर्षे निहालभाईंनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राजकारणापासून अलीकडच्या काही महिन्यांपासून ते दूर होते. १९९२ मध्ये अयोध्येतील वादग्रस्त वास्तू पाडल्याचा निषेध म्हणून त्यांनी आयुष्यभर सदऱ्याच्या एका बाहीला काळी पट्टी लावून तिचे प्रदर्शन केले. यातही जातीयवाद नाही तर धर्मनिरपेक्ष तत्त्वानुसार निषेधाचा तो भाग असल्याचे ते ठासून सांगत. १९७२ मध्ये काँग्रेसच्या आयेशा हकिम यांच्याकडून झालेला पराभव त्यांना फारच जिव्हारी लागला. त्यातून या समाजवादी नेत्याने रणनीती बदलली आणि १९९९ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत यशच मिळवीत गेले. स्पष्टपणा हा निहालभाईंचा स्थायीभाव होता. आपल्या कोणत्याही विधानापासून ते दूर गेले असे कधी घडले नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. सर्वच पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यामुळेच त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.