आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी अटक केलेला रणजीपटू मनीष गुड्डेवार याचे ‘काँग्रेस कनेक्शन’ समोर आले असून मनीष हा प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि राहुल गांधीच्या कोअर समितीचा सदस्य पंकज गुड्डेवार यांचा सख्खा लहान भाऊ आहे.  
मूळचा गडचिरोली जिल्हय़ातील रहिवासी असलेला मनीष हा नागपुरात वास्तव्याला होता. क्रिकेटवेडय़ा मनीषने २००३ ते २००५ या काळात रणजी सामने खेळले आणि याच काळात त्याची अजित चंडिला याच्याशी ओळख झाली. दोघेही एकत्र सराव करायचे तेव्हा डोले आणि भाटिया या दोन मित्रांचीही मनीषने चंडिलाशी भेट घडवून आणल्याची माहिती आता समोर आली आहे.
पंकज हा प्रदेश युवक काँग्रेसचा पदाधिकारी असून, राहुल गांधी यांच्या कोअर टीमचा सदस्यही आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत पंकज गुड्डेवारचे नाव अचानक प्रकाशझोतात आले. त्याचे कारण राहुल गांधी व मुकुल वासनिक यांच्या आशीर्वादाने त्याला ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीत थेट काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत पंकजचा दारुण पराभव झाल्यानंतर तो दिल्ली व प्रदेशच्या राजकारणात सक्रिय झाला. मुकुल वासनिक यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्याचा समावेश आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या भागांत आयपीएल तसेच क्रिकेट फिक्सिंगचा जुगार मनिषच्याच माध्यमातून चालायचा. यात विदर्भातील आणखी काही रणजीपटू तसेच जिल्हा पातळीवरील क्रिकेटपटू सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.