राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या निंबोळी गावातील सभेमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून जनतेची माफी मागितली. अजित पवार यांनी अकारण केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावतीने मी माफी मागतो, असे ट्विट शरद पवार यांनी केले.
निंबोळीमधील सभेमध्ये अजित पवार यांनी धरणात पाणी नाही, तर तेथे लघवी करायची का? लघवी करायलाही पाणी प्यावे लागते, असे बेताल वक्तव्य केले होते. सध्या भारनियमन रात्री असल्याने नंतर काहीच काम राहात नाही. त्यामुळे मुलांच्या जन्माची संख्याही वाढली, असे सांगून त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळले. त्यांच्या या विधानाचा राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला. त्याच वक्तव्यावरून खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांच्यावतीने माफी मागितली. अजित पवारांसाठी दुसऱयांदा शरद पवार यांना माफी मागण्याची वेळ आलीये. राजकारणात येण्यासाठी टग्याच व्हावे लागते, असे वक्तव्य त्यांनी पूर्वी केले होते. त्यावेळीही शरद पवार यांना त्यांच्यावतीने माफी मागावी लागली होती.