शरद पवार हे मार्केटमधलं क्रमांक एकचं नाणं आहेत. जेव्हा हेडलाईन करायची असते तेव्हा शरद पवारांचंच नाव घेतलं जातं हे शरद पवार यांचं भाग्य आहे आणि सगळ्यांच्या विश्वासाचं प्रतीक आहे. सहा दशकं हे नाणं टिकून आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातल्या काही मराठा आंदोलकांचे फोटो शरद पवारांसह व्हायरल झाले. त्याविषयी प्रश्न विचारला असता खासदार सुप्रिया सुळे यांनी हे उत्तर दिलं आहे. तसंच त्या कार्यकर्त्यांसह फक्त शरद पवारांचे नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो आहेत असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर
आशिष शेलार यांनी काही वेळापूर्वी असं वक्तव्य केलं की शरद पवार २०१९ ला पावसात भिजले आणि २०२३ पर्यंत त्यांच्या पक्षाची दोन शकलं झाली. आता ते पुन्हा पावसात भिजले त्यांचा पक्ष लोणच्याइतकाही उरणार नाही. याबाबत विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या. “आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. कुणाला जर असं म्हणायचं असेल तर त्यांना म्हणू द्या.”
“आज राज्याच्या समोर सर्वात मोठा प्रश्न असेल तर दुष्काळ, त्यानंतर काल परवाकडे झालेला पाऊस. या समस्येमुळे आता महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकारशी संपर्क साधावा. २६०० कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केल्याचं समजतं आहे. मात्र जी अतिवृष्टी झाली ती जास्त आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता केंद्रातलं पथक येईल असं पाहावं आणि पाहणी तसंच नोंद करुन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे ही आमची मागणी आहे.” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
छगन भुजबळांना टोला
माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्री यांनी त्यांच्यातली भांडणं बाजूला ठेवून कॅबिनेटमध्ये चर्चा करायला हवी. भाजपाच्या ९०/९५ आमदारांना मंत्रिपदं मिळालेली नाहीत. बाहेरून आलेल्यांना ती द्यावी लागली आहेत. त्यामुळे कॅबिनेट न घेता जर मंत्री बाहेर सभा घेत असतील आणि मागण्या करत असतील तर मग अंदाधुंद कारभार आहे. या राज्याला धोरण लकवा मारला आहे, म्हणूनच राज्यातल्या मंत्र्यांना बाहेर सभा घ्याव्या लागत आहेत असाही टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.