लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही असं उत्तर देत आणि आक्षेपार्ह हातवारे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बार्शी या ठिकाणी झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत काहीही मजा येत नाही कारण आमचे पैलवान तयार आहेत, आखाड्यातही उतरवलं आहे. मात्र समोर कोणीही नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच शरद पवार यांची अवस्था शोले सिनेमातल्या जेलरसारखी झाली आहे अशीही टीका त्यांनी केली. याच वक्तव्याचा समाचार शरद पवार यांनी बार्शी येथील सभेत घेतला.

शरद पवार यांचे निकटवर्तीय दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन हाती शिवबंधन बांधलं. आता ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. विकास करायचा आहे म्हणून दिलीप सोपल बाहेर पडले आहेत, मग राष्ट्रवादीत असताना सोपल यांना विकास करण्यापासून कुणी रोखलं होतं? असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला. दरम्यान शरद पवाराचे हातवारे आणि मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका म्हणजे ते बिथरल्याचं लक्षण आहे असं भाजपा नेत्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांची भाषा गावकडची आहे, त्यात एवढं मनाला लावून का घेता? असा प्रश्न शरद पवारांवर टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना जितेंद्र आव्हाड यांनी विचारलं आहे.