राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. मात्र सुरुवातीपासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीवर अजूनही शिवसेनेकडून ५० खोके, एकदम ओके अशा प्रकारची टीका केली जात आहे. या पार्श्वभूीवर नुकताच वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे त्यावरून राजकारण तापलं आहे. यासंदर्भात बोलताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांचेही कान टोचले आहेत.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी वेदान्ता प्रकल्पासंदर्भात बोलताना “असं व्हायला नको होतं, पण झालं”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. “हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. असं व्हायला नको होतं. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

सत्ताधारीच नव्हे, विरोधकांचेही टोचले कान!

दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे गट व भाजपासोबतच विरोधी पक्षांनाही सुनावलं. “आज टीव्ही लावला की एकच ऐकायला मिळतं.. झाड काय, हवा काय .. .एखाद्या वेळी ठीक आहे. पण रोजच या गोष्टी पाहायला मिळतात. राज्याच्या प्रमुख लोकांनी राज्याचा विचार मांडायला हवा. त्याऐवजी सातत्याने एकमेकांशी वाद काढले जात आहेत”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

“हा निर्णय बदलावा, प्रकल्प महाराष्ट्रात आणावा असं म्हटलं जातंय पण…”; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

“दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या संबंधी दूषणं द्यायची, वाद करायचे या गोष्टी बंद करायला हव्यात आणि महाराष्ट्रातील वातावरण सुधारून विकासाच्या दृष्टीने आपण पुढे कसे जाऊ, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत”, असा सल्ला शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नव्या प्रकल्पांसाठी प्रयत्न करा ना?”

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सध्या सुरू झालेल्या राजकारणावर बोलताना शरद पवार म्हणाले, “टीका करा, पण रोजच करू नका. एक दिवस-दोन दिवस ठीक आहे. किती दिवस? नवीन प्रकल्प कसे येतील, यावर लक्ष केंद्रीत करा ना”, असंही शरद पवार म्हणाले.