रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांच्या सभापती पदांसाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये अपेक्षेनुसार भाजप-सेना युतीची सरशी झाली.जिल्हा परिषदेमध्ये युतीचे स्पष्ट बहुमत असून सर्व समित्यांची सभापती पदे भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी सव्वा वर्ष कालावधीसाठी वाटून घेतली आहेत.
त्यामुळे या पूर्वीच्या सभापतींचा कार्यकाल संपुष्टात येऊन ही निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापतीपदावर अजित नारकर, अर्थ व शिक्षण समितीच्या सभापतीपदी सतीश शेवडे, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून स्मिता धामणस्कर यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडणुका बिनविरोध होऊ नयेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. पण निवडणूक निकालावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.
उपाध्यक्षपदी राजेश मुकादम
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी काल शिवसेनेचे राजेश मुकादम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपाध्यक्ष विश्वास सुर्वे यांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली.
 शिवसेनेचे उत्तर रत्नागिरीचे प्रमुख शशिकांत चव्हाण यांची गेल्या महिन्यात या पदावरून उचलबांगडी झाल्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांमध्ये नाराजी आहे. त्याचा फायदा उठवीत या निवडणुकीत चमत्कार घडवण्याचा इरादा राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला होता. पक्षातर्फे दोघांनी उमेदवारी अर्जही दाखल केले होते. पण ते मागे घेण्यात आल्यामुळे मुकादम यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेमध्ये युतीची सत्ता आहे. या दोन्ही ठिकाणी सर्व पदे भाजप आणि सेनेने प्रत्येकी सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी वाटून घेतली आहेत.
त्यामुळे जास्तीत जास्त सदस्यांना या पदांचा लाभ मिळत असला तरी विकासाची दीर्घकालीन योजना आखून कामे पूर्ण करणे कोणालाही शक्य होऊ शकत नाही. नव्याने निवडून आलेल्या उपाध्यक्ष आणि सभापतींच्या कालावधीत आगामी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या दृष्टीने ही पदे ताब्यात ठेवणे युतीसाठी महत्त्वाचे होते. त्यामध्ये युतीचे नेते यशस्वी झाले आहेत.