scorecardresearch

कणकवली कनेडी येथे शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांत धुमश्चक्री

कणकवली कनेडी येथे पाच तास शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली.

कणकवली कनेडी येथे शिवसेना – भाजप कार्यकर्त्यांत धुमश्चक्री
(फोटो सौजन्य- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सावंतवाडी  : कणकवली कनेडी येथे पाच तास शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली. राडा संस्कृतीने पुन्हा डोके वर काढले असल्याचे चित्र उभे राहिले. एकाला मारहाण झाल्याचे कारण या घटनेला कारणीभूत ठरले.   

कणकवली कनेडी येथे शिवसेना कार्यकर्ते कुणाल सावंत यांना सकाळी साडेनऊ वाजता मारहाण झाली. त्यानंतर १२ वाजता शिवसेना कार्यकर्त्यांनी कनेडीतील भाजप कार्यालयात घुसून राडा केला, तर साडेबारा वाजता भाजप कार्यकर्ते शिवसेना कार्यालयात घुसले. यानंतर तब्बल पाच तास कनेडी बाजारपेठेत प्रचंड तणाव होता. साडेपाचच्या सुमारास भाजप आणि शिवसेना पदाधिकारी कणकवलीच्या दिशेने रवाना झाल्यानंतर कनेडीतील तणाव निवळला आहे. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कनेडी बाजारपेठेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.   

शिवसेनेचे कार्यकर्ते तथा रिक्षाचालक कुणाल सावंत यांना भाजपचे कार्यकर्ते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोटय़ा सावंत यांनी मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनी भाजप कार्यालयात जाऊन राडा केला. या वेळी संदेश सावंत यांना धक्काबुक्की झाली. ही घटना समजताच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संजना सावंत आणि काही भाजप पदाधिकारी शिवसेना कार्यालयात घुसले. या वेळी झालेल्या झटापटीत शिवसेनेचे कुंभवडे गावचे सरपंच सूर्यकांत ऊर्फ अप्पा तावडे यांच्या डोक्याला दुखापत झाली. या घटनेनंतर कनेडी बाजारपेठेत प्रचंड तणाव निर्माण झाला. शिवसैनिकांना धीर देण्यासाठी आमदार वैभव नाईक हे कनेडी येथील शिवसेना कार्यालयात दाखल झाले. तर कणकवलीतून भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने कनेडी बाजारपेठेत दाखल होऊ लागले. यात मोठा राडा होण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, डीवायएसपी विनोद कांबळे आदींसह दंगल नियंत्रण पथक कनेडी बाजारपेठेत दाखल झाले. शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते मोठय़ा संख्येने एकत्र आल्याने वारंवार तणावाचे प्रसंग निर्माण होत होते. तब्बल पाच तास कनेडी बाजारपेठेत तणाव होता. अखेरीस पोलिसांत तक्रार देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी कणकवलीच्या दिशेने रवाना झाले आणि कनेडी बाजारपेठेतील तणाव निवळला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 04:57 IST

संबंधित बातम्या