राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सोलापूरात माध्यमांशी बोलताना राज्य सरकारवर टीका केली. तसेच, शिवसेना नेते संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यूपीएत सामील होणार असल्याच्या चर्चांना आलेल्या उधाणावर देखील दरेकरांनी प्रतिक्रिया दिली.

“शिवसेना काँग्रेसमध्ये गेलीच आहे त्यामुळे आता यूपीएत गेली तर काय विशेष? शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्ववादी विचारधारेला तिलांजली दिली आहे. हे आघाडी सरकार दीर्घकाळ टिकू शकत नाही. सरकार व प्रशासनामधील विसंवादामुळे आर्थिक घडी पूर्णपणे कोसळली असून राज्याचा विकास होताना दिसत नाही. तेव्हा स्थिर व भक्कम सरकारची आवश्यकता आहे.” असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तीन आघाड्या झाल्या तर….”

याचबरोबर, प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याच्या तक्रारीवरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू होणार आहे. यावर बोलताना दरेकर म्हणाले, ” देवेंद्र फडणवीसांवर कोणतेही खटले टाका काही फरक पडणार नाही. शंभर खटले टाकले तरी त्याला आम्ही भीक घालत नाही. राज्याची पाच वर्षे निष्कलंकपणे मुख्यमंत्रीपद भूषविणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि जनता त्यांच्या पाठिशी आहे.”

आम्ही लोक अशा खटल्याला भीक घालत नाही –

“देवेंद्र फडणवासांवर असे १०० खटले टाका, १०० आरोप करा, मात्र त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रात पाच वर्षे निष्कलंक कारकीर्द कुठलाही मुख्यमंत्री आजपर्यंत करू शकला नाही. ना एक रुपयाचा डाग त्यांच्यावर, ना त्यांच्या प्रतिमेवर त्यामुळे एक नाही शंभर खटले टाका. देवेंद्र फडणवीसांचं चारित्र्य, प्रतिमा त्यांच्या व्यव्हार महाराष्ट्राला माहीत आहे. असे शंभर खटले टाकले त्याचं उत्तर काय येणार आहे, हे न्यायालय योग्यवेळी देईल. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही लोक अशा खटल्याला भीक घालत नाही.” असं माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितलं.

तर, शिवसेनेवर निशाणा साधताना दरेकर म्हणाले की, “आपण बघाल ज्या दिवशी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून, सत्तेसाठी शिवसेना एकत्र आली. त्या दिवशी शिवसेनेने हिंदुत्वावादी विचारधारा असेल, मराठी माणूस असेल या सगळ्या भूमिकांना तिलांजली देऊन. सत्तेसाठी सगळ्यांसोबत जाण्याची भूमिका घेतलेली आहे. हे वारंवार त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे.”

स्थिर आणि भक्कम सरकारची आवश्यकता –

याचबरोबर, “मागेही सांगितलं हे सरकार कशाप्रकारे कोसळणार या काही सांगायच्या गोष्टी नसतात, परंतु हे सरकार दीर्घकाळ टीकूच शकत नाही. जो विसंवाद सरकारमध्ये आहे, तो प्रशासनात आहे. राज्याचा विकास एक इंच देखील पुढे जात नाही. त्यामुळे आर्थिक घडी पूर्णपणे कोसळलेली आहे. अशावेळी स्थिर आणि भक्कम सरकारची आवश्यकता आहे. त्यामुळे तीन पक्षांचं सरकार आपसातील विसंवादामुळे आणि विरोधातून शंभर टक्के कोसळणार म्हणजे कोसळणार.” असंही यावेळी दरेकरांनी बोलून दाखवलं.

सरकार नावाची गोष्टच आज दिसत नाही –

“मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत त्यावर मी काय सांगू शकतो, सध्या तर त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यामुळे आता जास्त बोलणं देखील उचीत नाही. कारण, प्रकृती एखाद्याची ठीक नसताना, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, की त्यांच्यावर टीका टिप्पणी करू नये. त्यामुळे व्यक्तीशा त्यांच्यावर आम्ही बोलत नाही. परंतु सरकार नावाची गोष्टच आज दिसत नाही. सरकार कुठेय? सरकार ना तालुक्यात, जिल्ह्यात, शहरात कुठेच दिसत नाही. सरकार म्हणून कुठलाच प्रकल्प पुढे जात नाही. का केंद्राचे आलेले प्रकल्प पुढे जात आहेत? त्यामुळे सरकार नावाची गोष्टच राज्यात कुठे अस्तित्वात असल्याचं दिसत नाही.” असंही दरेकर यांनी म्हटलं