scorecardresearch

“उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा, पण….” रामदास कदम उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक

जाणून घ्या उद्धव ठाकरेंवर रामदास कदम यांनी घणाघाती टीका केली आहे. खेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी टीका केली आहे.

Ramdas Kadam Slams Uddhav Thackeray
काय म्हटलं आहे रामदास कदम यांनी?

उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा दिसतो. पण त्यामागचे अनेक चेहरे मला माहित आहेत. केशव भोसलेंचा ड्रायव्हर मी होतो असं तुम्ही म्हणालात ते सिद्ध करून दाखवलं तर मी तुमच्या घरी भांडी घासायला येईन असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. ज्याच्या हाती धनुष्यबाण तो चोर असं तुम्ही म्हणता पण ज्याच्या हाती धनुष्यबाण तो राम असतो तुम्ही दुर्दैवी आहात तुमचे हात बरबटलेले आहेत असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

आम्ही खोक्यांमध्ये अडकलो नाही तुम्ही अडकलात

गद्दार, चोर, खोके हे तुमचे शब्द आहेत. मात्र आज सांगतो खोक्यांमध्ये आम्ही अडकलो नाही तुम्ही अडकलेला आहात. कावीळ झालेल्या लोकांना सगळं जग पिवळं दिसतं तसंच आहे. खोके तुम्ही घेता म्हणून तुम्हाला खोके दिसतात. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं का? असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला. रामदास कदम यांनी खेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी उद्धव ठाकरेंवर त्यांनी घणाघाती टीका केली आहे.

नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा तुम्ही घाबरला होतात

नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा तुम्ही किती घाबरला होतात. तुमची…. पिवळी झाली होती. कारमध्ये मला बसवल्याशिवाय तुम्ही कधी बाहेर पडत नव्हतात मला सगळ्या गोष्टी माहित आहेत असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून टाकलीत आणि एखाद्या हुकूमशहा सारखी तुम्ही वागत आहात असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. आत्ता जे तुम्ही केलं आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं असतं?

भास्कर जाधव नावाचा लांडगा तुम्हाला आवडतो आहे

भास्कर जाधव नावाचा लांडगा तुम्हाला आवडतोय. नया मुल्ला जोरसे बांग देता है.. तसं तुम्हाला हा बाडगा आता कडवा आणि एकनिष्ठ वाटतो. निवडणूक लढवण्यासाठी टेंपोच्या टेंपो मदत मी पाठवली होती हे हा बाडगा विसरला. १९९५ ला तुला तिकिट कुणी दिलं होतं भास्कर जाधव हे तू विसरलास का? योगेश कदम यांना आव्हान देण्यासाठी तुम्ही आला असलात तर असल्या १०० सभा घेतल्या तरीही काहीही फरक पडणार नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष संपवला आणि आता हिंदुत्वाची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. सोनिया गांधींच्या मांडीवर बसलात तेव्हा काहीच वाटलं नाही का? राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना लीलावतीहून घरी घेऊन गेले होते त्यामुळे राज ठाकरे हे काय त्यांचे ड्रायव्हर झाले का? असाही प्रश्न रामदास कदम यांनी विचारला आहे.

१९ मार्चला उत्तर मिळणार

स्वतःचे आमदार, नेते तुम्ही संपवत आहात आणि गद्दार आम्हाला म्हणत आहात. गद्दार आम्ही नाही तुम्ही आहात असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. स्थानिक आमदार, नेते यांना संपवण्यासाठी तुम्ही अनेक पावलं उचलली. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं नसतं तर आम्ही राजकारणातून संपलो असतो. काल जो तमाशा उद्धव ठाकरेंनी तमाशा केला त्याचं उत्तर १९ मार्चला तुम्हाला मिळणार आहे. व्याजासहीत परतफेड करण्यात येईल असा इशाराही रामदास कदम यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 11:15 IST