शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून आक्रमक भूमिकेत दिसले. सत्तावाटपापासून ते सत्तास्थापन होईपर्यंत राऊत यांनी भाजपावर टीका केली. गेल्या महिनाभरापासून ट्विटरवरून भाजपावर निशाणा साधणाऱ्या राऊत यांचे ट्विट हल्ले अजूनही सुरूच आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी आणखी एक ट्विट करत विरोधकांना शांत राहण्याचा सल्ला दिला.

भाजपासोबत मुख्यमंत्रीपदाच्या वाटपावरुन झालेल्या वादानंतर संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडण्यात शिवसेनेकडून संजय राऊत यांनी मोठी भूमिका निभावली. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन होण्यामध्ये शिवसेनेच्या बाजूने संजय राऊत यांचा मोलाचा वाटा आहे.

भाजपाचं अल्पमतातलं सरकार चार दिवसांत कोसळल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीनं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वीच त्यांनी आपण पत्रकार परिषद घेणार नसल्याचं जाहीर केलं होत. मात्र, राऊत यांनी आपली ट्विटची मालिका सुरूच ठेवली आहे. शायरीच्या माध्यमातून राऊत विरोधकांवर टीकेचे बाण सोडत आहेत.

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून शेर पोस्ट करत विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

“शेठ,
जिनके घर शीशे के होते हैं
वह दुसरो के घर पत्थर नहीं फेंका करते”

असं ट्विट राऊत यांनी केलं आहे.

रविवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. त्यानंतर फडणवीस यांनी नियम आणि संविधानानुसार कामकाज होईल, यासाठी आग्रही राहिल, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच राऊत यांनी ट्विट केलं आहे.