शिवसेनेत आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर सुरु झालेल्या लढाईला आता नवं वळण लागलं आहे. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हासाठी दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे गेले होते. ते चिन्हच आयोगानं गोठवलं आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानं अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ‘शिवसेना’ हे नावही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना वापरता येणार नाही आहे. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी ‘खोकेवाल्या गद्दारांनी’ म्हणत बंडखोर गटावर टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं की, “खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवेसना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते!”

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर उज्वल निकम यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयात…”

“ईडी, सीबीआयनंतर आयोगही बेठबिगार…”

तर, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “सरकारच्या स्वायंत्त संस्था ईडी, सीबीआयनंतर निवडणूक आयोगही बेठबिगार झाला आहे. कोणी तरी तक्रार केली, याची छानणी न करता निवडणूक आयोगाने चार तासात आदेश दिला आहे. कोणाच्या आदेशानुसार हे सर्व सुरु आहे. देश हुकूमशाहीकडे चालला आहे,” असे अरविंद सावंत यांनी म्हटलं.