१६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेश युद्धात भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मृतीप्रीत्यर्थ दोन दिवसांपूर्वी देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. हा विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी केंद्र सरकारकडून देखील कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मात्र, दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचं नाव देखील न घेतल्यावरून सध्या राजकीय वाद सुरू झाला आहे. एकीकडे काँग्रेसकडून मोदी सरकारच्या या कृतीचा निषेध केला जात असतानाच आता शिवसेनेनं यावरून परखड शब्दांत टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं आहे.

“इंदिरा गांधींनी धाडस दाखवलं नसतं, तर…”

१९७१ च्या युद्धात इंदिरा गांधींनी घेतलेल्या निर्णयांचं शिवसेनेनं कौतुक केलं आहे. “इंदिरा गांधींना वगळून देशाचाच नव्हे, तर जगाचा इतिहास कुणाला लिहिता येणार नाही. पण आपल्या देशातल्या खुज्या राज्यकर्त्यांना हे सांगणार कोण? इंदिरा गांधींनी धाडस दाखवलं नसतं, तर पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवताच आली नसती”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“इंदिरा गांधींचं नाव घ्यायला भय वाटतं की लाज?”

दरम्यान, इंदिरा गांधींच्या निर्णय क्षमतेचं कौतुक करतानाच शिवसेनेनं मोदी सरकारवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेनं पाहाल, तर पाकिस्तानचे केले तसे तुकडे करू, असा संदेश इंदिरा गांधींनी जगाला दिला. त्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना सध्याच्या राज्यकर्त्यांनी इंदिरा गांधींचं साधं नावही घेऊ नये? त्यांचं नाव घ्यायला भय वाटतं की लाज वाटते? इंदिरा गांधींनी १९७१ चा पराक्रम केला, तेव्हा आजचे दिल्लीतले राज्यकर्ते कदाचित गोधडीत रांगत असतील”, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

इंदिरा गांधींनी सर्जिकल स्ट्राईक न करता सरळ…

दरम्यान, इंदिरा गांधींनी तेव्हा सर्जिकल स्ट्राईक केला नाही, असं म्हणत शिवसेनेनं खोचक टोला लगावला आहे. “एखाद्या राज्यकर्त्यास मंदिरं बांधता येतील, नद्या साफ करता येतील पण पाकिस्तानची फाळणी करून बांगलादेशची निर्मिती करता येणार नाही. इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवायचं ठरवलं आणि सर्जिकल स्ट्राईक वगैरे न करता सरळ हल्लाच केला. १९७१ च्या युद्धातील हिंदुस्थानी सैन्याचा पराक्रम विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या विजयामागची शक्ती इंदिरा गांधींची होती, हे विसरून कसं चालल?” अशा शब्दांत शिवसेनेनं मोदी सरकारच्या कृतीचा निषेध केला आहे.

मुख्यमंत्रीपद असूनही शिवसेना निधी मिळवण्यात मागे, राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पुढे!

देशभक्ती दुर्मिळ झाली आणि…

“काँग्रेससोबत तुमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद असू शकतात. तरीही देश घडवणाऱ्या नेत्यांविषयी आकस ठेवणं हे सच्च्या हिंदुस्थानीचं लक्षण नाही. इंदिरा गांधींना श्रेय द्यायचं नाकारलं, तरी बांगलादेश युद्धाचा विजय त्यांच्याच नावावर नोंदवला जाईल. लहान मनाच्या राज्यकर्त्यांकडून देश महान कसा होणार? देशभक्ती दुर्मिळ झाली आणि बेईमानी बेछूट वावरू लागली, तर राष्ट्र हे राष्ट्र राहात नाही”, असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे.