राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केली होती. हा शेतकऱ्यांचा आणि जाट समाजाचा अपमान असल्याचं मत राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं होतं. यावरून शिवसेनेनं ( ठाकरे गट ) धनकड यांच्यासह भाजपावर ‘सामना’ अग्रलेखातून हल्लाबोल केला आहे. मिमिक्री प्रकरण हे मूळ प्रश्नावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात, अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.

“‘पदावरील बाहुल्यांनी अपमानाचा बाऊ करू नये,’ अशा आशयाची एक म्हण जर्मनीत आहे. आपल्या देशात या म्हणीचा प्रत्यय रोज येताना दिसतोय. देशावरचे हे संकटच म्हणावे लागेल. १९७५ साली देशावर आणीबाणी लादली तेव्हा लोकशाहीसाठी छाती पिटणारे जनसंघाचेच लोक होते, पण आज त्यांचा आत्मा मेला आहे. उघड्या डोळ्यानं ते लोकशाहीचे दमन पाहत आहेत. मिमिक्री प्रकरण हे मूळ प्रश्नावरील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच आहे. संविधान पदावर निर्जीव बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. बाहुल्यांचे अश्रू खोटे असतात,” असं ठाकरे गटानं म्हटलं.

Narendra Modi reuters
काँग्रेस लोकांची संपत्ती लुटून मुस्लीम, घुसखोरांमध्ये वाटेल असं का वाटतंय? पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
congress leader rahul gandhi slams pm modi over electoral bond issue
निवडणूक रोखे हा खंडणीचा प्रकार; राहुल गांधी यांची टीका
Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा

“धनखड यांनी राज्यसभेत संसद घुसखोरीच्या मुद्दयावर बोलू दिले नाही”

“न झालेल्या अपमानाचे भांडवल पंतप्रधान मोदी व त्यांचा भाजपा करत आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी राज्यसभेत संसद घुसखोरीच्या मुद्दयावर बोलू दिले नाही. विरोधी पक्षांच्या खासदारांनी गृहमंत्री शहा यांच्याविरोधात उग्ररूप धारण केले तेव्हा उपराष्ट्रपतींनी राज्यसभेतील भाजपाविरोधी खासदारांना सरळ निलंबित केले. संसदेच्या पायरीवर निलंबित खासदार घोषणा देत बसले. लोकसभेतील निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जगदीश धनखड यांच्या वागण्या-बोलण्याची नक्कल करून तेथे हशा व टाळ्या मिळवल्या हा आता वादाचा विषय ठरला. धनखड यांचे म्हणणे असे की, हा ‘जाट’ समुदायाचा अपमान आहे. पंतप्रधान मोदी यांनी लगोलग धनखड यांना फोन करून सांगितले, “असा अपमान मी २० वर्षे सहन करीत आहे.” मोदी यांनी असे बोलणे हे आक्रित आहे. गेल्या दहा वर्षापासून मोदी यांनी संसदेत व बाहेर आपल्या विरोधकांच्या नकलाच केल्या. त्यामुळे एखाद्याची नक्कल करणे हा दंडनीय किंवा रडारड करण्यासारखा अपराध नाही,” असं ठाकरे गटानं सुनावलं आहे.

“धनखड यांच्या मिमिक्री प्रकरणाने काय साध्य केले?”

“गृहमंत्री संसदेतील घुसखोरीवर बाहेर बोलतात व संसदेत येण्याचे टाळतात, हा संसदेचा अपमान नाही काय, हे आधी पंतप्रधान मोदी व उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीने स्पष्ट केले पाहिजे. संविधानाची खुर्ची म्हणजे पानाची गादी नाही, की राष्ट्रीय प्रश्नावर फक्त चुना लावत बसायचे. सध्या देशात तेच चालले आहे. धनखड यांच्या मिमिक्री प्रकरणाने काय साध्य केले? भाजपाचा मुखवटा गळून पडला. धनखड यांनी त्यांच्या कारकीर्दीत डझनभर पक्ष बदलले आहेत. त्यामुळे एखाद्या विचाराशी ते पक्के आहेत काय? तर नाहीच. ते हिंदुत्ववादी वगैरे कधीच नव्हते,” असं टीकास्र ठाकरे गटानं धनखड यांच्यावर सोडलं आहे.

“सध्या देशात काही लोक हिटलरची नक्कल करतात”

“मोदी यांनी ‘मिमिक्री’ प्रकरणात धनखड यांचे अश्रू पुसले व संसदेत असे होणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगितले. सत्य असे की, मिमिक्रीचा प्रकार संसदेत घडला नाही, तो संसदेच्या बाहेर घडला. राजकीय व्यासपीठावरून अनेक नेते एक दुसऱ्यांची नक्कल करून सभेत टाळ्या मिळवत असतात. सध्या देशात काही लोक हिटलरची नक्कल करतात. हिटलरप्रमाणे त्यांचे जगणे, वागणे, राज्य करणे सुरू आहे. याबद्दल जगभरातील उरलेल्या हिटलरभक्तांनी आक्षेप घेतला पाहिजे. उलट आपल्या देशात अशी हिटलरशाहीची नक्कल चालणार नाही, येथे लोकशाहीच राहील, असे सांगणाऱ्यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले जाते. हा संविधानाचा अपमान आहे असे संविधानिक वगैरे पदांवर बसलेल्या व्यक्तींना का वाटू नये?” असा सवलाही ठाकरे गटानं उपस्थित केला.

“किसान समुदायाच्या या अश्रूची दखल कोणी घेतली काय?”

“धनखड म्हणतात, त्यांचा अपमान हा त्यांच्या जातीचा व किसान वर्गाचा अपमान आहे. धनखड ‘जाट’ समुदायातून येतात. शेकडो जाट काळ्या कृषी कायद्याविरुद्ध दीड वर्ष दिल्लीच्या सीमेवर ऊन-पाऊस-थंडीत आंदोलन करीत होते. त्यांचे ‘जाट’ नेते राकेश टिकैत यांना उखडून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा टिकेत यांच्या डोळयांत अश्रू तरळले. किसान समुदायाच्या या अश्रूची दखल कोणी घेतली काय? धनखड आपल्या समुदायाच्या अपमानाबाबत तेव्हा काहीच बोलले नाहीत. दिल्लीच्या ‘जंतर मंतर’वर हरयाणातील महिला कुस्तीपटू त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आंदोलन करीत होत्या. त्यांनाही उखडून फेकण्याचे दमनचक्र तेव्हा झाले. या मुलीही ‘जाट’ समुदायाच्याच घटक होत्या व त्यांच्या अपमानाविरुद्धही विद्यमान उपराष्ट्रपती, पंतप्रधान वगैरेंनी संवेदना व्यक्त केल्याचे दिसत नाही. गेल्या दहा वर्षात देशाने व जनतेने असे अनेक अपमान सहन केले आहेत व त्या अपमानाची भरपाई होणे शक्य नाही. स्वत:च्या न झालेल्या अपमानाची रडारड करायची व इतरांची प्रतिष्ठा व स्वाभिमान पायदळी तुडवून मजा बघायची असे प्रकार सध्या सुरू आहेत,” असा हल्लाबोल ठाकरे गटानं धनखड यांच्या मिमिक्री प्रकरणावरून केला आहे.