श्रीदेव मुरलीधर मंदिराच्या अमृत महोत्सवानिमित्त सुधागड पाली येथील स्वाध्यायी रत्नाकर सुंदरबुवा मराठे यांचे श्रीमद्भगवतगीता या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी बोलताना भगवत्गीता काय शिकवते हे सांगितले. भगवत्गीता धर्मक्षेत्रे या शब्दाने सुरू होते आणि मम शब्दाने संपते म्हणून भगवतगीता ‘मम धर्म’ शिकवते. हा मम धर्म म्हणजे आपला अर्थात कर्तव्यपालनाचा धर्म हे त्यांनी सोप्या शब्दात उलगडून सांगितले. संपूर्ण गीतेत प्रश्न विचारणारा अर्जुन माझा मोह नष्ट झाला, माझी स्मृती परत आली, कर्तव्याची जाणीव झाली हे सर्व तुझ्या कृपेने झाले आता देवा तू सांग आणि मी करीन असे शेवटी म्हणू लागला. देव भक्तांसाठी कसा साहाय्यकारी होतो हे सांगताना त्यांनी सुदामा, पांडव यांची उदाहरणे दिली. भगवान कृष्णांचे विचार अर्थ, मान, अहंकार इ. सोडून सर्व प्राणिमात्रांपर्यंत पोचवले तर मनुष्यातील बंधुत्व वाढेल आणि सध्या दिल्ली, मुंबई इ. ठिकाणी चाललेल्या घटना थांबतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्या वेळी मराठे यांनी देवस्थानच्या नित्यक्रम ज्ञानेश्वरी पारायण इ. उपक्रमांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालींना शुभेच्छा दिल्या. सत्र न्यायाधीश मा. भास्करराव हे एक कर्तव्यदक्ष न्यायाधीश होते, अशा शब्दात त्यांचा गौरव केला. त्यांना मिळालेल्या विविध पदांची खुलासेवार माहिती त्यांनी सर्व श्रोतृवर्गापुढे विशद केली.
अध्यक्षीय भाषण व महोत्सव कमिटीच्या अध्यक्षांचे मनोगताला उत्तर देताना मा. भास्कर शेटय़े म्हणाले की, देशात चाललेले अत्याचार, भ्रष्टाचार यांच्या दाव्यांना आज निकाल मिळतो. न्याय मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. धर्म व धर्मबुद्धी यांचा देशात मेळ राहिला नाही. स्वातंत्र्यापूर्वी धर्म होता. आता धर्माचा धंदा झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जागतिक कीर्तीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनीही प्रमुख पाहुणे म्हणून सत्काराला उत्तर देताना म्हणाले , सोन्याची द्वारका निर्माण करताना सचोटीचा व्यापार कसा असतो गोपालकृष्णांनी हे सिद्ध केले.

अध्यात्माच्या नकारात्मक विचारांना सकारात्मक करण्याचे महत्कार्य कृष्णाने केले. त्याच विचाराने चंद्रावर भारतीय शास्त्रज्ञ गेल्यामुळे चंद्रावर पाणी असल्याचे भारतीय शास्त्रज्ञांनी सिद्ध केले. भारत सर्वच क्षेत्रात पुढे आहे याचे कारण भारताची संस्कृतीच आहे. हाच विचार जगाला तारील असेही ते म्हणाले. भगवान श्रीकृष्ण हे द्रष्टे होते. त्यांनी सुमारे ५००० वर्षांपूर्वी  पर्यावरण , ज्ञान, युद्धनीती, व्यापारी कौशल्य , साधनापेक्षा उद्दिष्टांना महत्त्व देण, सेवाभाव, नि:स्वार्थीपणा , सहनशीलता, संघटित कृती, सेवा , वैश्विक धर्माला प्रोत्साहन ,  गरीबांना मदत , स्त्रियांना प्रतिष्ठा देणे , नम्रता, कौशल्यपूर्ण नेतृत्व, लोकांच्या मनाचा विचार करण्याची वृत्ती असे सोळा विचार जगापुढे मांडले. ते आजच्या युगालाही सर्वमान्य झाले आहेत. त्यातूनच त्यांचा द्रष्टेपणा सिद्ध होतो. अडचणीवर मात करण्यात पुरुषार्थ आहे अडची निर्माण करण्यात नाही हा कृष्णचरित्राचा गाभा आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हा खऱ्या अर्थाने राजा नव्हता तर तो राजा निर्माण करणारा युगपुरुष होता असे अनेक मौलिक विचार श्रीकृष्णाच्या अवतारी जीवनाच्या आधारे दा. कृ. सोमण यांनी व्यक्त करताना महाभारतातील अनेक उदाहरणे सांगितली.
त्यानंतर देवस्थानचे व उत्सव कमिटीचे सेक्रेटरी अरुण डाकवे यांनी आभाराचे काम केले.
रात्रौ ११ ते १ या वेळात मराठी चॅनलच्या सुप्रसिद्ध कलावंतांचा विरंगुळा हा कार्यक्रम विघ्नेश जोशी प्रस्तुत मराठी वाद्यवृंदाने सादर केला. त्यात चित्रपट अभिनेते प्रदीप पटवर्धन, रमेश वाणी, कल्याणी जोशी, कु. यश जोशी, गौतम मुरडेश्वर, निमिला कैकाडी, सुहास चितळे हे सहभागी होते. यावेळी ३००० जनतेने महाप्रसादाचा लाभ घेतला व रात्रौ स्थानिक महिला कलाकारांच्या करमणुकीच्या कार्यक्रमाने या अमृत महोत्सवाची सांगता झाली.