-मंदार लोहोकरे

पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रूक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आज संपन्न झाला. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला. करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थिती हा सोहळा संपन्न झाला.

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केलेला आहे. हा विवाह सोहळा पूर्वी उत्पात समाज करीत होते. त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहेत. हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगेबिरंगी फुलांनी सजविले होते. सकाळी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने सजविले गेले. साधारणता सकाळी ११ वाजता रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला. तिथे गुलालाची उधळण झाली. त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे घेवून गेले आणि तिथेही गुलालाची उधळण झाली.

टाळ – मृदुंगाच्या गजरात विवाह सोहळा झाल्याचा आनंद साजरा –

त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची अलंकाराने सजविलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणली गेली. मुंडावळ्या बांधल्या गेल्या आणि वऱ्हाडी म्हणजेच भाविक जमा झाले. मुलीचे मामा मुलीला घेवून या असे पुकारले गेले. अंतरपाट धरला आणि सुरु झाल्या मंगलाष्टका… उपस्थितीतांना फुले आणि अक्षतांचे वाटप केले गेले आणि मग आता सावध सावधान … ही मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा झाल्याचा आनंद साजरा केला. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानान गुरव , व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,मंदिर समितीचे सदस्य यांच्यासह मोजकेच भाविक या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्री विठ्ठलाची रंगपंचमी सुरू –

वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठलास पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येत असतो. या काळात दररोज गुलालांची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते. वसंतपंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत म्हणजे एक महिना श्री विठ्ठलाची रंगपंचमी सुरु राहणार. या रंगपंचमी उत्सवाचा शुभारंभ आज वसंतपचंमीच्या निमित्ताने झाला. आजपासून सावळा विठूराया आणि रुक्मिणी माता पांढऱ्या शुभ्र पोशाख दिसतील.