धक्कादायक निर्णयांनी कित्येक कुटुंबांना जातीतून बहिष्कृत करून त्यांना जीवन जगणे अवघड करणाऱ्या जोशी (भटके) समाज जात पंचायतींच्या सहा पंचांची सोमवारी येथील न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. परंतु, याचवेळी सिडको पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या याच स्वरूपाच्या गुन्ह्यात औरंगाबाद पोलिसांनी या पंचांना अटक केली. त्यातील रामदास धुमाळ हा छातीत दुखत असल्याचे कारण दाखवून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या ‘मुलीला विष पाजून मारा किंवा स्वत: आत्महत्या करा’ असे सांगून वाळीत टाकणाऱ्या येथील जोशी (भटक्या) समाज पंचायतीच्या छळवादाविरोधात मुलीचे वडील अण्णा हिंगमिरे यांनी आवाज उठविल्यानंतर या स्वरूपाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी शहरातील गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करत पंचायतीचे अध्यक्ष भास्कर शिंदे याच्यासह भिमराव गंगाधर धुमाळ, रामदास बापू धुमाळ, मधुकर बाबूराव कुंभारकर, एकनाथ निळूभाऊ शिंदे, शिवाजी राजू कुंभारकर या पंचांनाही अटक केली होती. न्यायालयाने सहा संशयितांची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली. तिची मुदत सोमवारी संपुष्टात आली. पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधिशांनी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यावेळी औरंगाबाद पोलिसांचे पथक दाखल झाले. औरंगाबाद येथील सिडको पोलीस ठाण्यात पंचायतीच्या पंचांविरुद्ध गणेश विठ्ठल धुमाळ यांनी तक्रार दिली आहे. आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून जात पंचायतीने त्यांना वाळीत टाकले. या प्रकरणी सहा पंचांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jul 2013 रोजी प्रकाशित
जात पंचायतीचे म्होरके औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक निर्णयांनी कित्येक कुटुंबांना जातीतून बहिष्कृत करून त्यांना जीवन जगणे अवघड करणाऱ्या जोशी (भटके) समाज जात पंचायतींच्या सहा पंचांची सोमवारी येथील न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. परंतु, याचवेळी सिडको पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या याच स्वरूपाच्या गुन्ह्यात औरंगाबाद पोलिसांनी या पंचांना अटक केली.
First published on: 09-07-2013 at 04:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six member of cast panchayat send to judicial custody