सोलापूर जिल्ह्यात मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालमोटारीवर पाठीमागून कार आदळून घडलेल्या भीषण अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस शिपायाचा सख्ख्या भावासह जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी व मुलांसह चौघेजण जखमी झाले. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना हा अपघात झाला. दयानंद आण्णाराव बेलाळे (वय ३०) हे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि त्यांचे बंधू सचिन आण्णाराव बेलाळे (वय ३२, रा. रोखडा सावरगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. तर त्यांच्या पत्नी राणी ऊर्फ स्वाती सचिन बेलाळे (वय २५) व दीपाली ऊर्फ जयश्री दयानंद बेलाळे (वय २२) तसेच त्यांची मुले त्रिशा (वय ८) आणि श्लोक (वय १) हे जखमी झाले असून त्यांना सोलापुरात वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले आहे.