सोलापूर येथील अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचे शासकीय महाविद्यालय बंद होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्याना एसएमएस करण्याची मोहीम, शिक्षणमंत्र्यांनी महाविद्यालय बंद करण्याची दिलेली धमकी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यानंतर टिकेची झोड उठल्यावर तंत्रनिकेतन महाविद्यालये बंद करण्यात येणार नसल्याचे आश्वासन.. अशा सगळ्या नाटय़पूर्ण घडामोडींनंतरही आता हे महाविद्यालय पुढील शैक्षणिक वर्षांपासून सुरू  राहण्याबाबत संदिग्धताच आहे.

सोलापुरात अनेक वर्षांपासूनचे जुने शासकीय तंत्रनिकेतन अखेर बंद होत असून त्याबाबतची प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे. अक्कलकोट रस्त्यावर ३६ एकर क्षेत्रातील आलीशान व देखण्या इमारतीत शासकीय तंत्रनिकेतन गेल्या सुमारे ६० वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेत संगणकशास्त्रासह स्थापत्य, मेकॅनिक, माहिती व तंत्रज्ञान, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रिकल्स, वस्त्रनिर्माण आदी सात विद्या विभागात मिळून सहाशे विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून हे शासकीय तंत्रनिकेतन पुन्हा सुरू करावयाचे झाल्यास राज्य शासनाकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचीही (एआयसीटीई) पुन्हा एकदा मान्यता घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून नवे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सध्याचे जुने तंत्रनिकेतन बंद होण्याचीच जास्त शक्यता आहे. तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. डी. कटारे यांनी त्यास दुजोरा दिला आहे. तंत्रनिकेतन बंद करण्याबाबत अद्यापि स्पष्ट आदेश प्राप्त झाले नसले तरी त्याचीच प्रतीक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले. या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अध्यापन व बिगर अध्यापन मिळून २५० इतके मनुष्यबळ कार्यरत आहे. या मनुष्यबळाबाबतही आदेश मिळाले नाहीत, असे प्राचार्य डॉ. कटारे यांनी सांगितले.

सोलापूरसह राज्यातील सहा शासकीय तंत्रनिकेतन बंद करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गेल्या ऑक्टोबरमध्ये घेतला होता. या निर्णयाला विरोधही झाला. अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करताना हे जुने तंत्रनिकेतन बंद न करता कायम ठेवावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली होती. दरम्यान, एसएफआय संघटनेच्या आवाहनानुसार तंत्रनिकेतनच्या शेकडो विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांना थेट एसएमएस करून शासकीय तंत्रनिकेतन बंद न करण्याची मागणी केली असता तावडे यांनी एसएमएस करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना थेट संपर्क साधून एसएमएस करून त्रास दिल्याबद्दल धमकावले होते. त्याचवेळी  शासकीय तंत्रनिकेतन बंद होणार, हे कोणी सांगितले, अशी विचारणाही केली होती. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

पदविका महाविद्यालय का हवे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेक गोरगरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण घेणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. त्यापेक्षा तंत्रनिकेतनच्या माध्यमातून तंत्रशिक्षणाच्या पदविका घेणे सोपे होते. या पदविका संपादन केल्यानंतर पुढे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांत थेट प्रवेश मिळतो. या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. याच मुद्दय़ावर विद्यार्थी व पालकांनी एकवटून शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्यास जोरदार विरोध केला होता. या प्रश्नावर स्टुडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या विद्यार्थी संघटनेने आंदोलन हाती घेतले. आता हे शासकीय तंत्रनिकेतन वाचविण्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन कृती समिती गठीत केली आहे.