सोलापूर : वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड मोठय़ा प्रमाणावर होत आहे. परिणामी चिमण्यांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. हा सार्वत्रिक चिंतेचा विषय बनला असताना सोलापुरात पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करतानाच वातावरणात चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी अनोखा संकल्प हाती घेतला आहे. समाजात निसर्गप्रेम वाढणे, विशेषत: शालेय मुलांना चिमण्यांचा लळा लागणे आणि पोलीस आणि जनता यांच्यात सुसंवाद कायम राहणे असे या संकल्पाचे मुख्य पैलू आहेत.

पोलीस आयुक्त बैजल यांनी काही दिवसांपूर्वी चिमण्यांचे घरटे शालेय मुलांना उपलब्ध करण्याचा उपक्रम कृतीत आणला आहे. उत्तरोत्तर त्यात भर घालण्याचा आणि समाजात चिमण्यांच्या रूपाने निसर्गप्रेम वाढविण्याचा त्यांचा निर्धार आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी आपल्या ‘गुलमोहर’ सरकारी बंगल्याच्या हिरवाईने नटलेल्या विस्तीर्ण परिसरात ‘पक्षिघर’ उभारले आहे. हे पक्षिघर येत्या १ जानेवारी रोजी नववर्षांपासून शालेय मुलांना खुले होत आहे. पोलीस मुख्यालयातील पोलीस-पब्लिक स्कूलमधील मर्यादित मुला-मुलींच्या हस्ते हे पक्षिघर खुले होणार आहे. या पक्षिघरातच जखमी पक्ष्यांसाठी उपचार केंद्रही उभारण्यात आले आहे. त्यासाठी ‘नेचर का?न्झेर्वेशन सेंटर’च्या पक्षी व प्राणिमित्रांचा सक्रिय सहयोग मिळणार आहे. योग्य शुश्रूषेनंतर पक्ष्यांना पुन्हा निसर्गात सोडले जाणार आहे.

बैजल म्हणाले, गुलमोहर बंगल्याच्या परिसरात खूप हिरवळ आहे. येथे पोपट, मैना, कबुतर, कोकिळा, घार, कावळे असे अनेकविध पक्ष्यांची किलबिल असते. परंतु चिमण्या दिसत नाहीत. ही बाब मनाला काहीशी खटकली. चिमण्यांचा वावर वाढावा म्हणून काय करता येईल या दृष्टीने पक्षिमित्रांशी चर्चा केली. त्यातूनच पक्षिघराचा जन्म झाला आणि शालेय मुलांना चिमण्यांचे घरटे उपलब्ध करून देण्याचाही संकल्प समोर आला. या माध्यमातून लहान मुलांमध्ये पक्षी तथा निसर्गप्रेम वाढू शकेल आणि पोलिसांशी लहान मुलांची जवळीकही वाढेल. पर्यायाने पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा उत्तरोत्तर प्रबळ होईल, अशी अपेक्षा बैजल यांनी व्यक्त केली आहे.

सोलापुरात चिमण्यांच्या संवर्धनासाठी पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हाती घेतलेला उपक्रम विधायक आहे. हजारो शालेय मुलांना चिमणी घरटे उपलब्ध केल्यास त्या माध्यमातून चिमण्यांचा चिवचिवाट वाढेल. याशिवाय अधूनमधून बामणी मैना, दयाळ यांसारखे पक्षीही येतील. चिमण्यांचे घरटे त्यासाठी उपयुक्त आहे. हैदराबादमध्ये त्याचा पहिल्यांदा प्रयोग झाला होता. आपण त्याचा अनुभव घेतला आहे.

– डॉ. अरिवद कुंभार,ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ, अकलूज

चिमणी घरटे चिमण्या वाढण्यासाठी आणि निसर्गाविषयी मुलांमध्ये गोडी निर्माण होण्यासाठी लाभदायक आहेत. त्याचे प्रयोग होत आहेत. वाढत्या शहरीकरणाचा विचार करताना चिमण्यांना वाचविण्याच्या दृष्टीने असे प्रयोग आश्वासक आहेत.

– भरत छेडा, पक्षी व प्राणिमित्र, सोलापूर