मिरजोळे गावाच्या परिसरातून वाहणाऱ्या स्थानिक नदीचे वाळू-मातीने भरलेले पात्र मोकळे करण्यासाठी तातडीची उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. या गावाची नदीकाठी असलेली जमीन २००६ च्या पावसाळ्यात खचू लागल्याने मोठे खड्डे पडले. त्यानंतर सलग दोन वष्रे हा प्रकार चालू राहिल्यामुळे या ठिकाणी नदीकाठी संरक्षक भिंत बांधण्यासाठी सुमारे ५८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने २००८ मध्ये तयार करून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवला, पण तो लाल फितीच्या कारभारात अडकून पडल्यामुळे आजतागायत काहीही उपाययोजना झालेली नाही. मिरजोळेच्या ग्रामस्थांनी मात्र या विषयाचा सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. या संदर्भात जिल्हाधिकारी राजीव जाधव यांच्याकडे निवेदन देण्यात आल्यानंतर काल दुपारी संबंधित शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांची संयुक्त बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. तसेच त्यानंतर लगेच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेथील शेतांमध्ये अनेक ठिकाणी खचलेली जमीन आणि नदीच्या मुख्य पात्रात माती व वाळूचा सुमारे शंभर मीटर लांबीचा पट्टा दिसून आला. या पट्टय़ामुळे नदीचे मुख्य पात्र बदलले असल्याचे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर तातडीची उपाययोजना म्हणून हा पट्टा बाजूला करून नदीचा प्रवाह मोकळे करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच केली. त्यानुसार येत्या महिनाभरात कार्यवाही करण्यात येणार आहे.
या परिसरात पावसाचे पाणी साठून शेतजमिनींमध्ये मोठय़ा प्रमाणात पाझर सुरू होतात आणि जमीन खचते, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. नदीचे पात्र मोकळे केल्यामुळे या परिस्थितीत फारसा फरक पडण्याची शक्यता नाही, पण पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा शेतजमिनीवर पडणारा दाब कमी होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रयोगाच्या परिणामांचा अभ्यास करून पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी योजना आखण्याचा मनोदय जिल्हाधिकारी जाधव यांनी व्यक्त केला.