अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘अप्सरा आली’सह विविध गाण्यांवर सादर केलेला नृत्याविष्कार आणि अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीसह भटकंती या आवडत्या विषयावर मांडलेले बिनधास्त मत, यामुळे येथील सपकाळ नॉलेज हबच्या वतीने आयोजित ‘अस्तित्व-२०१३’ या वार्षिक सोहळ्याची रंगत वाढली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. डॉ. राजेंद्र शिंगणे, ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर, माजी आमदार विठ्ठलराव पाटील, अभिनेते सुरेंद्र पाल हे उपस्थित होते. वार्षिक नियतकालिक ‘अस्तित्व-२०१३’ आणि ‘केआरसीएमएम मॅनेजमेंट जर्नेल २०१३’ यांचे प्रकाशन या वेळी प्रमुख पाहुण्यांसह संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सपकाळ, कल्याणी सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे विद्यापीठात सहा वर्षांत केजी टू पीजी आणि रिसर्च सेंटर उभारणारी ही एकमेव संस्था असल्याचा उल्लेख रवींद्र सपकाळ यांनी केला. आ. शिंगणे यांनीही शिक्षण संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. मिलिंद गुणाजी यांची मुलाखत श्रद्धा महाले यांनी घेतली. गुणाजी यांनी चित्रपट कारकीर्द, वाचन आणि आपल्या आवडत्या भटकंती या छंदाविषयी सविस्तर उत्तरे दिली. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन, इतिहास याविषयी असलेले गुणाजी यांचे ज्ञान पाहून उपस्थितही चकित झाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी अप्सरा आली, आता वाजले की बारा यांसह काही हिंदी गीतांवर नृत्य सादर केले. त्यांच्या नृत्याविष्कारास उपस्थितांकडून टाळ्या-शिट्टय़ांची दाद मिळाली. स्टेट बँक ऑफ श्रावणकोरचे मुख्य प्रबंधक ए. के. सिंग यांनी सपकाळ हब ही संस्था ज्ञानवंतांची प्रयोगशाळा होईल, असा आशावाद व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये तिन्ही महाविद्यालयांमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या १६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपये, सन्मानपत्र तसेच व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे वार्ताकन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचे बक्षीस रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आले. आभार अविनाश दरेकर यांनी मानले.