टोलच्या विषयावरून आंदोलन करून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नाही. ज्या टोल नाक्यांबाबत राज ठाकरे यांना आक्षेप आहेत, त्याबद्दल मनसे व राष्ट्रवादीचे तज्ज्ञ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात चर्चा होऊ शकते. त्यावेळी एखाद्या टोल कंपनीच्या कामात खरोखरच काही त्रुटी वा आक्षेपार्ह असे काही आढळल्यास कारवाई करता येईल. त्यामुळे या विषयावर चर्चेतून मार्ग काढता येईल, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. चर्चेऐवजी जर राज ठाकरे यांना आंदोलनच करण्यास स्वारस्य असेल तर तो केवळ राजकीय स्टंटबाजीचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलीस यंत्रणेने मनसेच्या जवळपास २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.