रत्नागिरी : राज्यात मशिदींवरील भोंगे काढण्याचा विषय गाजत असतानाच रत्नागिरीतील मुस्लीम बांधवांनी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपण यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी शहर पोलीस स्थानकअंतर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय मुस्लीम समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या या बैठकीत मुस्लीम समाजाच्या वतीने रफीक बिजापूरकर यांनी, मशिदीवरील भेोंगे काढण्याचा विषय राज्यात गाजत असताना रत्नागिरीतील मुस्लीम बांधवांनी भोंग्यांचा आवाज मर्यादित ठेवणारी आहुजा कंपनीची अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतला आहे, असे जाहीर केले. पहाटेच्या वेळी अत्यंत कमी कालावधीसाठी व कमी आवाजात अजान दिली जाईल, तर इतर वेळीसुद्धा मर्यादित आवाजात अजान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत होणार असल्याचेही बिजापूरकर यांनी सांगितले.

पुढील आठवडय़ात ३ मे रोजी रमजान ईद आणि अक्षय तृतीया हे दोन सण साजरे करण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लिमांसह सर्व समाज येथे एकोप्याने राहतात. शेकडो वर्षांची ही परंपरा कायम ठेवत सर्वानी उत्साहात सण साजरे करावे, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी उपस्थितांना केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनी, मशिदींवरील भोंग्याचा आवाज मर्यादित झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही, असे स्पष्ट केले. मुस्लीम समाजाच्या या निर्णयाचे उपस्थित शांतता कमिटीच्या सदस्यांनी कौतुक केले. श्री देव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नीलेश भोसले, मराठा मंडळाचे पदाधिकारी केशवराव इंदुलकर, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर इत्यादी राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीला उपस्थित होते.