सोयाबीनचे बनावट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार ओम राजेिनबाळकर यांनी केली, तर बियाणे न उगवलेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी विभागाकडे केली.
आमदार राजेिनबाळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु यातील बहुतांश शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नाही. कळंब तालुक्यातील शेलगाव (ज) येथील शेतकरी सर्जेराव शिनगारे यांनी त्यांच्या शेतातील सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या कारणावरून १६ जुल रोजी आत्महत्या केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती घडू नये, यासाठी बनावट बियाणे विकणाऱ्या दुकानदार, कंपनी तसेच महाबीजवर खुनाचा गुन्हा नोंदवून प्रशासनाने या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
‘बियाणे न उगवलेल्या शेतीचे पंचनामे करावेत’
दरम्यान, जिल्ह्यात सोयाबीन पेरणी केलेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. काही कंपन्यांचे बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे बियाणे न उगवलेल्या शेतीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषी विभागाकडे केली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात आजवर बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या. परंतु अनेक तालुक्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे पेरलेले बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने माजी मंत्री पाटील यांनी काही गावात जाऊन बियाणे न उगवलेल्या शेतजमिनीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट घेऊन गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मानसिकता खचल्याचे, तसेच बियाणे न उगवल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आणून दिले.