महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये ठाणे जिल्हा गती घेताना दिसत आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्य़ात सन २०११-२०१२ मध्ये आत्तापर्यंत जवळपास १७२५९ कामे पूर्ण झाली आहेत, तर जवळपास १३७७२ कामे प्रगतिपथावर आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात ‘नरेगा’ अंतर्गत जिल्ह्य़ात पूर्ण झालेल्या कामांची आणि प्रगतिपथावर असलेल्या कामांची संख्या यावर्षी लक्षणीय आहे. सन २०११-१२ या आर्थिक वर्षांत या योजनेअंतर्गत जवळपास ५९०७ कामे पूर्ण झाली होती. यावर्षी आत्तापर्यंत झालेली कामे पाहता ही संख्या जवळपास तिपटीने वाढल्याचे आकडेवारीत स्पष्ट होत आहे. या योजनेअंतर्गत सन २०११-१२ मध्ये आतापर्यंत जवळपास १७२५९ कामे पूर्ण झाली आहेत. तसेच प्रगतिपथावर असणाऱ्या कामांची संख्याही गेल्यावर्षीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. गेल्या वर्षीची ६०२२ कामे प्रगती पथावर आहेत. तर  १३७७२ कामे प्रगतीपथावर आहेत.
जिल्ह्य़ात नोंदणीकृत कुटुंबांची संख्या या वर्षी २.५६ लाख इतकी आहे. मनुष्य दिवस निर्मिती आणि योजनेवर झालेल्या खर्चाची आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. सन २०११-१२ मध्ये ४२.५५ लाख मनुष्य दिवस निर्मिती झाली होती. तर या योजनेवर ८१७७.९६ लाख रुपे खर्च झाला होता. यावर्षी मात्र आतापर्यंत १९.७० मनुष्य दिवस निर्मिती झाली असून खर्चही ४७८१.४४ लाख रुपये इतका झाला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पालघर आणि डहाणू तालुक्यातील आढावा बैठक घेण्यात आली. त्यात मंत्रिमहोदयांनी दिवाळीनंतर आदिवासी बांधवांचे स्थलांतर रोखण्यासाठी नरेगाची अंमलबजावणी अधिक गतीने करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार कृषि विभाग, महसूल विभाग, आदिवासी विकास विभाग आणि इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी नरेगाच्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.