महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या ६७ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या बदल्यांचे आदेश निघाल्याने अनेकांना दिलासा मिळाला असला तरी नांदेड जिल्ह्यातल्या तीन रिक्त पदांवर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही.
राज्यातल्या वेगवेगळय़ा भागांत कार्यरत असलेले पोलीस उपअधीक्षक व सहायक पोलीस आयुक्त हे गेल्या अनेक महिन्यांपासून बदल्यांच्या प्रतीक्षेत होते. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्या बदल्यांचे आदेश जारी होतील, असे वाटत होते. पण वेगवेगळय़ा कारणांमुळे हे आदेश रखडले होते. सोमवारी गृह विभागाने राज्यातल्या ६७ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन येथे कार्यरत असलेल्या मीना मकवाना यांची औरंगाबाद येथे समाजकल्याण विभागात बदली करण्यात आली आहे. लातूर शहरचे तिरुपती काकडे यांची अक्कलकोट येथे बदली करण्यात आली आहे. मूळ लातूरचे रहिवासी असलेले कालिदास सूर्यवंशी यांची ठाणे शहर येथे तर दहशतवादविरोधी पथकाचे अशोक कामत यांची बृहन्मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरचे केशव पातोंड यांची जळगाव येथे तर तासगावचे दिलीप शंकरवार यांची पुणे येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. बदल्यांच्या आदेशामध्ये मराठवाडय़ातल्या अधिकाऱ्यांना फारसे स्थान मिळाले नाही. तीनचार वगळता मराठवाडय़ातील कोणत्याही अधिकाऱ्यांना बदलण्यात आले नाही. शिवाय मराठवाडय़ातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातही गृह विभागाने उदासीनता दाखवली आहे. नांदेड जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (गृह) तसेच भोकर व किनवट येथील पोलीस उपअधीक्षक पदे रिक्त आहेत. बदल्यांच्या आदेशामध्ये ही पदे भरली जातील, असे वाटत होते. परंतु गृह विभागाने रिक्त पदे भरण्याचे सौजन्य दाखवले नाही. नांदेडसह मराठवाडय़ातल्या अन्य जिल्ह्यांतील रिक्त पदे कायम असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीचा बंदोबस्त करताना उपलब्ध अधिकाऱ्यांची काम करताना चांगलीच दमछाक होणार आहे. राज्याच्या गृह विभागाच्या दप्तरीही नांदेड जिल्ह्याची ओळख संवेदनशील म्हणून आहे. असे असले तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाचे धोरण मात्र आश्चर्यकारक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State 67 dysp transfer
First published on: 18-06-2014 at 01:54 IST