नागपूरमध्ये विधान भवनात पाणी साचले तसेच वीज गेली यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन दिवसांमध्ये योग्य ती उपाययोजना करण्यात येईल आणि सोमवारी विधीमंडळाचं कामकाज व्यवस्थित करता येईल अशी हमी दिली. त्यानंतर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं आहे.

नागपूरमध्ये विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून शहरात रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे विधीमंडळातील वीज पुरवठा खंडीत झाला. तळघरात पाणी साचल्याने विधान भवनातील वीज पुरवठा खंडीत झाल्याचं समोर आलं. अंधारामुळे विधान भवनातील कामकाज ठप्प झाल्याने सरकारची नाचक्की झाली आहे. वीज नसल्याने कामकाज बंद करावे लागल्याची ही पहिलीच वेळ असून यासाठी सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे, अशी टीका विरोधकांनी केली. विरोधकांनी हातामध्ये टॉर्च घेऊन प्रतीकात्मक निषेधही व्यक्त केला.

नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा (शुक्रवारी) तिसरा दिवस आहे. गुरुवारी रात्रीपासून नागपूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे विधान भवनाच्या परिसरात पाणी साचले. सकाळी विधान भवनात प्रवेश करताना आमदारांची तारांबळ उडत होती. काही वेळाने विधान भवनातील वीज पुरवठाही खंडीत झाला. यामुळे कामकाज ठप्प झाले. आमदारांना अंधारातच बसावे लागले. नाणार प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या शिवसेना आमदारांनी मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात घोषणा बाजी करावी लागली.

विधान भवनातील वीज गायब झाल्याने सरकारची नाचक्की झाली असून विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या हट्टीपणामुळे ही वेळ ओढावली आहे. मुंबई तुंबताना बघितली आहे, पण आज काही तासांच्या पावसात नागपूरही तुंबताना बघितले, असा टोला अजित पवार यांनी लगावला. सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे विधी मंडळाच्या कामकाजाचा वेळ वाया गेला, अशी टीका त्यांनी केली.