scorecardresearch

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

जालना : विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी उद्या (बुधवार) आणि गुरुवार असे दोन दिवस लाक्षणिक संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि राज्य चतुर्थश्रेणी (गट ड) कर्मचारी महासंघाने या संपाची हाक दिली. राज्यात १७ लाख सरकारी आणि निमसरकारी राज्य कर्मचारी आहेत.

विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन केले होते. गेल्या वर्षी राज्यात एक दिवस संप केला होता. परंतु मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आता दोन दिवसांचा लाक्षणिक संप करण्यात येत असल्याचे जालना जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस पठाण याह्या यांनी सांगितले. या संपात महसूल आणि राज्य शासनाच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसह निमसरकारी कर्मचारीही सहभागी होत असल्याची माहिती जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणेश कावळे यांनी दिली. नवीन सेवानिवृत्ती वेतन योजना रद्द करून संबंधित जुनी योजना लागू करावी, सेवानिवृत्तींच्या किमान वेतनात केंद्र सरकारने वाढ करावी, सर्व कर्मचाऱ्यांना समान किमान वेतन द्यावे, योजना कामगारांना (अंगणवाडी, आशा वर्कर्स इत्यादी) सेवेत नियमित करावे, आरोग्य विभागास अग्रक्रम देऊन सर्व विभागातील रिक्त पदे भरावीत, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या कोणत्याही अटींशिवाय कराव्यात आदी मागण्यांसाठी हा संप आहे, असे सांगण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: State government employees strike from today zws