दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर देशातील भाजपाशासित अनेक राज्यांनी इंधन दरात कपात केली आहे. केंद्रापाठोपाठ भाजपशासित राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्यावर महाराष्ट्रातही महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील कर कमी करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका करत  इंधनदरात सवल देण्याची मागणी केली आहे.

 “केंद्र सरकारने या दिवाळीनिमित्त संपूर्ण देशासह महाराष्ट्राला दिवाळी भेट म्हणून पेट्रोल आणि डिझेलवर सूट दिली आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे संजय राऊत बोलतात पाच आणि दहा रुपयांनी काय होते. केंद्र सरकारने दर कमी करुन महाराष्ट्राला भेट दिली आहे. तर आपण महाराष्ट्र सरकारला सांगावे की दिवाळी भेट म्हणून इंधनावरुन कर आकारल्यानंतर येणारा जो १२ रुपये नफा आहे तो कमी करुन सवलत द्यायला पाहिजे. संजय राऊत आपण केंद्रावर प्रत्येक गोष्टीवरुन टीका करता पण आपल्या महाराष्ट्रात एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत. दिवाळीच्या दिवशी आंदोलन करत आहेत. त्यांची मागणी आपण का पूर्ण करत नाही,” असे नवनीत राणा यांनी म्हटले आहे.