महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची ४१ वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २ ते ५ मे या कालावधीत धाटाव-रोहा येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेत २३ जिल्ह्य़ांचे १८ वर्षांखालील मुले व मुलींचे ४६ संघ सहभागी होणार आहेत.
रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा तालुका क्रीडा संकुल धाटाव, तालुका रोहा येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय ज्युनिअर खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडले जाणार आहेत. रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार हे या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते आहेत.
स्पर्धा संयोजन समितीचे कार्याध्यक्ष तथा रोह्य़ाचे नगराध्यक्ष अवधूत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे सदस्य स्पर्धेची तयारी करीत आहेत. रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विजय मोरे, संघटक समितीचे सचिव छत्रपती पुरस्कार विजेते नथुराम पाटील, रोहा तालुका खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाशीलकर, आमदार अनिल तटकरे हे या स्पर्धेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत. अलंकार कोठेकर, आशीश पाटील, तानाजी जाधव, सूर्यकांत ठाकूर, विशाल शिंदे, लक्ष्मण गावव, नीलेश केणी आदी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.