राज्यातील एसटी कामगारांना अपेक्षित वेतनवाढ न झाल्यास पुढील महिन्यात बेमुदत संपाचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी दिला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन येत्या शनिवारी (१६ मार्च) येथे होणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, एसटीच्या प्रवासी भाडय़ातील सवलतीचे १२६३ कोटी रुपये, कामगार करारातील ३५२ कोटी रुपये व अन्य बाबींचे मिळून एकूण १७०४ कोटी रुपये शासनाकडे थकित आहेत. तसेच एसटी कामगार संघटनेशी २०१२ ते २०१६ या काळासाठी नवीन वेतन करारही झालेला नाही. त्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक पावले न उचलल्यास बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागेल. येथे होणाऱ्या अधिवेशनात त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.
एसटीच्या बिकट आर्थिक परिस्थितीला कामगार जबाबदार नसल्याचे स्पष्ट करून चव्हाण म्हणाले की, शासनाने प्रवाशांना भाडय़ामध्ये २३ प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्याचे १२६३ कोटी रुपये, पोलीस आणि कैद्यांच्या प्रवासाचे ८७ कोटी रुपये, युती शासनाच्या काळात झालेल्या शेतकरी मेळाव्यांसाठी वाहतुकीचे २ कोटी रुपये इत्यादी मिळून मोठी रक्कम थकीत आहे. ती मिळाल्यास एसटीची आर्थिक स्थिती सुधारू शकते. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे एसटीच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची तक्रार चव्हाण यांनी केली.