शेतजमिनीचा मालकीहक्क देत नाही, एका सुनेलाही सासरी न नांदवता पळवून लावल्याच्या वादातून सावत्र मुलांनी आईचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृणपणे खून केल्याची घटना माढा तालुक्यातील केवड येथे घडली. या प्रकरणी एका महिलेसह चौघा जणांविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे.

राजाबाई ऊर्फ राणी हरिश्चंद्र पवार (वय ४०) असे खून झालेल्या दुर्दैवी सावत्र मातेचे नाव आहे. तिची आई कमलाबाई रमेश काळे (वय ६०, रा. डोणज, ता. मंगळवेढा) हिने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार या गुन्हय़ात राहुल हरिश्चंद्र पवार (वय ३०) व कृष्णा हरिश्चंद्र पवार (वय २२) या दोघा भावांसह नातेवाईक वसंत इस्माईल पवार व फुलाबाई इस्माईल पवार यांची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. यापैकी राहुल व कृष्णा या दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे.

राणी व तिचा दुसरा पती हिंमत शिंदे यांच्यासह लहान मुले घरासमोर रात्री आठच्या सुमारास गप्पा मारत बसले असताना राणी हिची सावत्र मुले राहुल व कृष्णा यांच्यासह वसंत पवार व फुलाबाई यांनी तेथे येऊन भांडण काढले. शेतजमीन नावावर का करून देत नाही, असा जाब विचारत सावत्र मुलांनी राणी हिला मारझोड करायला सुरुवात केली. त्याच वेळी थोरल्या सुनेला सासरी न नांदवता माहेरी हाकलून दिल्याचाही राग काढून सावत्र आईवर मुलांनी कोयता व अन्य लोखंडी हत्यारांनी हल्ला चढवला. यात डोक्यावर, पोटावर, गळय़ावर, मानेवर वर्मी वार झाल्याने ती जागीच मृत्युमुखी पडली. या वेळी तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या छोटय़ाशा लक्ष्मीवरही वार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.