दिल्ली आणि मध्य प्रदेशमध्ये चिमुरडय़ा मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांनी समाजात फोफावत चाललेल्या विकृतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले असतानाच अशाच चार घटनांनी सोमवारी महाराष्ट्राची मानही खाली घातली. पुण्यातील शिरूर आणि हडपसर तसेच नागपूर व अकोला येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने राज्यातील महिला व लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे पाच वर्षीय बालिकेवरील बलात्काराचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. मात्र, आरोप-प्रत्यारोप व घोषणाबाजीमुळे कोणतीही विधायक चर्चा न होता गोंधळातच कामकाज तहकूब झाले.
शाळेतच विद्यार्थिनीवर बलात्कार
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील शाळेत दहावीच्या सुट्टीतील वर्गासाठी आलेल्या चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची घटनी सोमवारी सकाळी घडली. ही मुलगी पाणी पिण्यासाठी वर्गाबाहेर आली असता वैभव नारायण ढोमे या तरुणाने या मुलीस जबरदस्तीने शाळेतील एका वर्गात नेले व तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उघड झाल्यानंतर वैभवला तातडीने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दुसरीकडे, पुण्यातील हडपसर येथे शंकर उमला पवार या गवंडीकाम करणाऱ्या तरुणाने तेरा वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर त्याला अटक करण्यात आली.
नागपूर, अकोल्यातही अत्याचार
नागपूर : नागपुरात महाल परिसरातील दसरा रोड भागात एका अल्पवयीन मुलाने त्याच्या पाच वर्षांच्या आतेबहिणीलाच लक्ष्य केले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अकोला शहरातील जुन्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी शेख सद्दाम शेख अयुब फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
संसदेत केवळ गदारोळ
नवी दिल्ली : मध्यांतरानंतर सुरू झालेल्या संसद अधिवेशनाचा पहिलाच दिवस गोंधळात वाया गेला. दिल्लीतील बलात्काराच्या मुद्यावरून विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजी व आरोप प्रत्यारोपांमुळे कोणत्याही ठोस चर्चेविना दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब झाली. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही सभागृहांत निवेदन सादर करताना गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या कथित वक्तव्यावरून सोमवारी नवे वादंग उभे राहिले होते. ‘बलात्कार सगळीकडेच होतात’ असे शिंदे यांनी म्हटल्याचे वृत्तवाहिन्यांनी दाखवले. मात्र, आपण ‘देशभरात अन्यत्रही बलात्कारच्या घटना घडल्याची नोंद आहे’ असे म्हटलो होतो, असा खुलासा शिंदे यांनी केला.