मध्य प्रदेशातील धारच्या सावकाराला लुटून आणलेले चोरीचे सुमारे १ कोटींपेक्षा अधिक रकमेचे सोन्या-चांदीचे दागिने गुन्हेगारांनी शहरात विकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचे पथक शहरात तळ ठोकून आहेत.
फेब्रुवारी महिन्यात मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील राजगड येथील सावकार जवाहर जैन यांना लुटण्यात आले. सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून ते लोकांना कर्जाऊ रक्कम देतात. चार आरोपींनी त्यांना भर दिवसा बांधून लुटले. लुटीतील हे सोने सुमारे ५५ किलो चांदी व अर्धा किलो सोने श्रीरामपूर शहरात आणून विकण्यात आले. आता या लुटीतील सोने हस्तगत करण्यासाठी धारचे पोलीस पथक आता शहरात आले आहे.
सावकार जैन याच्या लूटप्रकरणी पोलिसांनी हंसराज शर्मा (रा. भुलेर, ता.सरदारपूर, जि. धार) यास व त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. या दोघांनी नाशिक येथील प्रभू भगवानसिंग नावाच्या गुन्हेगारामार्फत हे सोने शहरात विकले होते. एमएच १५ एल ३९२१ या क्रमांकाच्या इंडिका मोटारीतून हे गुन्हेगार एका महिलेसह शहरात आले. एका हॉटेलवर त्यांनी मुक्काम केला. शिर्डी-शिंगणापूरला आम्ही दर्शनासाठी आलो आहोत, असे त्यांनी सांगितले होते. दागिन्याची विक्री केल्यानंतर ते निघून गेले. चार ते पाच गुन्हेगारांच्या या टोळीने लुटलेले सोने हे सव्वा कोटीपेक्षाही अधिक रकमेचे असावे, परंतु आयकर खात्यामुळे चोरीची रक्कम कमी दाखविली गेली असावी, असे तपासी अधिका-यांचे मत आहे. शहरातीलच एका गुन्हेगारामार्फत चोरीच्या सोन्याची विक्री झाल्याचे मध्य प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे. या पोलिसांनी गुन्हेगारांचे मोबाइल कॉलचे रेकॉर्ड काढले आहे. त्या माध्यमातून त्यांना चोरीचे सोने घेणा-यापर्यंत पोहोचता येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.
राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर अनेक गुन्हेगार चो-या व दरोडे घालतात. काही धूम स्टाईल दागिने पळवतात. खिसेकापूंची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. हे गुन्हेगार शहरात गुन्हे करत नाही. चोरीच्या सोन्याची विक्री शहरात यापूर्वी करण्यात आली. त्यात काही व्यापा-यांना अटक झाली. तर काही साक्षीदार झाले होते. यापूर्वी ज्या व्यापा-यांनी चोरीचे सोने घेतले त्यांची माहिती मध्य प्रदेश पोलिसांनी शहर पोलिसांकडून घेतली आहे. पोलीस उपनिरीक्षक के. आर. पाटील, गोपाल सोलंकी यांच्या नेतृत्वाखालील पथक गुन्ह्याचा तपास करीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2014 रोजी प्रकाशित
चोरलेल्या १ कोटींच्या दागिन्यांची श्रीरामपूरला विक्री
मध्य प्रदेशातील धारच्या सावकाराला लुटून आणलेले चोरीचे सुमारे १ कोटींपेक्षा अधिक रकमेचे सोन्या-चांदीचे दागिने गुन्हेगारांनी शहरात विकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांचे पथक शहरात तळ ठोकून आहेत
First published on: 09-04-2014 at 02:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stolen worth rs 1crore jewelery sale in shrirampur